सोलापुरातील पार्कजवळ बसविलेल्या ‘डीपी’ला महावितरणनं दिलं लतादीदींचं नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 08:05 PM2022-02-08T20:05:30+5:302022-02-08T20:05:35+5:30

अठ्ठावीस वर्षांपासून दीदींचं नाव : मानपत्र सोहळ्यासाठी लावले होते रोहित्र संच

Latadidi's name was given by Mahavitaran to the 'DP' set up near the park in Solapur | सोलापुरातील पार्कजवळ बसविलेल्या ‘डीपी’ला महावितरणनं दिलं लतादीदींचं नाव

सोलापुरातील पार्कजवळ बसविलेल्या ‘डीपी’ला महावितरणनं दिलं लतादीदींचं नाव

Next

सोलापूर : तब्बल अठ्ठावीस वर्षांपूर्वी सूरसम्राज्ञी लतादीदींना महापालिकेच्या वतीने मानपत्र दिले होते. हा सोहळा हजारोंच्या साक्षीनं पार्क मैदानावर झाला. त्याच्या तयारीसाठी तत्कालीन वीज मंडळानं अतिरिक्त डीपी अर्थात रोहित्र संयंत्र बसविले अन् त्याचं नामकरणही ‘लता मंगेशकर’ डीटीसी असं करण्यात आलं.

लतादीदींच्या निधनामुळे सारा देश शोकसागरात बुडाला. त्यांच्या संपर्क, संदर्भ आणि आठवणींना आता उजाळा मिळत आहे. पार्क मैदानावर सकाळी फिरायला जाणारे किंवा सायंकाळी चौपाटीवर आलेल्या प्रत्येकाच्याच दृष्टिक्षेपात पडणाऱ्या या ‘डीपी’ला दीदींचं नाव नेमकं कशामुळं दिलं, हे जाणून घेतलं असता वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी १९९४ रोजी झालेेल्या दीदींच्या मानपत्र सोहळ्याचा संदर्भ दिला.

ओळख पटण्यासाठी महावितरण ‘डीपीं’ना जवळील वास्तू, चौक, पेठ, प्रचलित ठिकाणाचे नाव देण्यात येते. लतादीदींच्या सन्मानार्थ महावितरण पार्कजवळील ‘डीपी’ला त्यांचेच नाव दिले आहे. पूर्वी दोनशे केव्हीचा असलेली ‘डीपी’ सध्या पाचशे केव्हीचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लतादीदी आणि सोलापूरचा ऋणानुबंध १९३८ पासूनचा आहे. भागवत चित्रपट संकुल पाहण्यासाठी आणि शंकरदादा भागवत यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी त्या सोलापुरात आल्या होत्या. २८ फेब्रुवारी १९८३ रोजी वालचंद महाविद्यालयासाठी अशोक चौक येथील कॉलेजच्या मैदानावर लतादीदींच्या गायनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारी १९९४ ला मानपत्र प्रदान करण्याचा समारंभ झाला होता.

----

दीदींची सोलापूर भेट स्मरणात राहावी म्हणून..

पार्कजवळील ‘लता मंगेशकर’ डीपी महापालिकेच्या वीज मागणीवरून दोन दिवसांत बसविला होता. लतादीदींची सोलापूर भेट कायम स्मरणात राहावी, यासाठी त्यांचे नाव देण्यात आले, असे तत्कालीन कनिष्ठ अभियंता आणि सध्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

Web Title: Latadidi's name was given by Mahavitaran to the 'DP' set up near the park in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.