Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:20 AM2023-11-23T03:20:13+5:302023-11-23T04:44:55+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले

Dy cm Devendra Fadnavis' Mahapuja of consort Shri Vitthal-Rakhumai in pandharpur at kartiki Ekadashi | Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

सोलापूर - सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यास केलेला विरोध मागे घेतल्यानंतर आज लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले. नियोजित वेळेप्रमाणे त्यांनी पहाटे २.१५ वाजता सपत्नीक श्री विठ्ठल आणि रखुमाईची महापूजेला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकऱ्यावरील संकट दूर व्हावे, पावसामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना फडणवीसांनी विठुरायाकडे केली.  

देवेंद्र फडणवीसांची पंढरपुरात शासकीय महापूजा करण्याची, विठु-माऊलीचं सपत्नीक दर्शन घेण्याची ही सहावी वारी आहे. त्यामुळे, या सहाही वारीसाठी आम्हाला विठ्ठल-रखुमाईच्या महापुजेची संधी दिली, त्याबद्दल त्यांनी मंदिर समितीचे आभार मानले. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागणं मागितलं. तसंच मागणं मी विठुरायाचरणी करतो, सर्वांना सुखी ठेवण्याची, समाधानी ठेवण्याची शक्ती माऊलीने आम्हाला द्यावी, असेही फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि सर्वच जिल्हा प्रशासनाचे आभारही मानले. दरम्यान, वारकरी बबन दादा घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्यास मानाचे वारकरी होण्याचा बहुमान मिळाला. 

पंढरी नगरीत श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेतही लाखांवर भाविक उभे आहेत. ही दर्शनरांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर दूरपर्यंत गेली आहे. तर, संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूरनजीक दाखल झाले आहेत. येथील ६५ एकर परिसरात लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्यात आहेत. तर, ६५ एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याहस्ते सपत्नीक महापुजेला सुरुवात झाली. तत्पूर्वी, महाराष्ट्रातील प्रमुख मानाचे फडकरी, संतांचे वंशज तथा वारकरी संघटनांचे प्रमुख यांची भेट घेत त्यांनी संवाद साधला. महंतांच्यावतीने फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महापुजेचं लाईव्ह स्ट्रिमींग सुरू केलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियाच्या माध्यमातून या महापुजेचा लाभ त्यांच्या समर्थक व फॉलोअर्सला घेत येत आहे. 

सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य

यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे, या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत. 

Web Title: Dy cm Devendra Fadnavis' Mahapuja of consort Shri Vitthal-Rakhumai in pandharpur at kartiki Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.