‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:18 PM2024-05-16T15:18:33+5:302024-05-16T15:37:54+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील प्रचारादरम्यान महायुतीच्या प्रचाराची सुत्रे नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीसाठी शरद पवार आघाडीवर राहून प्रचार करत आहेत. यादरम्यान, शरद पवार यांनी जुन्या काळातील आठवण सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगलेली आहे. सध्या राज्यात पाचव्या टप्प्यातील जागांवर प्रचार जोरात सुरू आहे. या प्रचारादरम्यान महायुतीच्या प्रचाराची सुत्रे नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीसाठी शरद पवार आघाडीवर राहून प्रचार करत आहेत. यादरम्यान, शरद पवार यांनी जुन्या काळातील आठवण सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.
शरद पवार जुन्या काळातील आठवण सांगताना म्हणाले की, नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा शेतीसंबंधी कुठलाही मुद्दा असला की ते माझ्याजवळ यायचे. मी गुजरातला जायचो. एकदा मी इस्राइलला जात होते. तेव्हा मोदींनी मला फोन केला. ते म्हणाले की, माझ्या अमेरिकेचा व्हिसा फेटाळण्यात आला आहे. मला तुमच्यासोबत इस्राइलला यायचं आहे. तेव्हा मी त्यांना इस्राइलला घेऊन गेलो. चार दिवसांपर्यंत मी त्यांना इस्राइलमधील शेती क्षेत्रातील प्रगतीशील तंत्रज्ञान दाखवलं, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार यांनी धर्मावरून टीका करण्याचा मुद्द्यावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले नरेंद्र मोदींकडे सध्या सांगण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे सध्या ते जाती धर्मावरून बोलत आहेत. ते विषयांतर करण्याचं काम करत आहेत. मोदी जे काही सांगत आहेत. त्यामध्ये एक टक्काही सत्य नाही आहे. देश जात आणि धर्म पाहून चालत नाही. सध्या नरेंद्र मोदी विषय जात आणि धर्माभोवती फिरवत आहेत कारण त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.