Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

By सुधीर राणे | Published: April 3, 2024 04:24 PM2024-04-03T16:24:56+5:302024-04-03T16:27:15+5:30

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठिमागून दुसऱ्या डंपरची धडक

Triple accident at Halwal Sindhudurg; Fortunately there was no loss of life | Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

Sindhudurg: हळवल येथे तिहेरी अपघात; सुदैवानं जिवीतहानी टळली

कणकवली : तालुक्यातील हळवल येथून शिरवलकडे जाणाऱ्या मार्गावर तीन वाहनांमध्ये धडक होवून अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरची धडक बसली. तर त्या डंपरची धडक दुचाकीला बसल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, धडक देणाऱ्या डंपरचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास झाला.

हळवल- कळसुली-शिरवल मार्गावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची वर्दळ असते. यापूर्वीही काहीवेळा या ठिकाणी ओव्हरलोड खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचे अपघात झालेले आहेत. सोमवारी सकाळी हळवल येथील  गिरण नजीकच्या तीव्र उतारावर डंपर (क्रमांक एम.एच.०७ ए.जे. ९०४५) चा चालक तेथे मूळ मालकाकडून पास घेण्यासाठी थांबला होता. तर त्या डंपर मालकाने डंपर समोरच आपली दुचाकी उभी केली होती.  रस्त्याच्या बाजूला थांबून ते बोलत होते. 

दरम्यान, शिरवल येथून कणकवलीच्या दिशेने खडी वाहतूक करणारा डंपर ( क्रमांक एम.एच.०७ सी ५१९९) जात होता. उभ्या असलेल्या डंपरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी त्या चालकाने आपल्या ताब्यातील डंपर कणकवलीच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घेतला. मात्र डंपर मध्ये ओव्हरलोड खडी असल्याने त्या तीव्र उतारावर डंपरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. हा अपघात एवढा तीव्र होता की, या अपघातात डंपर (क्रमांक एम.एच. ०७ सी -५१९९) च्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. तर डंपर चालक हा डंपरमध्येच अडकून पडला होता. चालकाच्या छातीला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. तर धडक दिलेल्या डंपरचे मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात दुचाकी डंपरखाली चिरडली गेली. 

अपघाताची माहिती मिळताच हळवल मधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मागील डंपर मध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हळवल -शिरवल- कळसुली या मार्गावरून मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक केली जाते. यासाठी वापरले जाणारे डंपर हे भरधाव वेगाने जात असल्याने या ठिकाणी वारंवार छोटे – मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरना वेळीच आवर घालावा, अशा मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Triple accident at Halwal Sindhudurg; Fortunately there was no loss of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.