सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:24 PM2018-01-25T15:24:58+5:302018-01-25T15:40:17+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.

Sindhudurg: The result of the medical officer Bhagwat Bhagwat in Vaibhavwadi rural hospital | सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणाम

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉ. तुषार भागवत यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले रुग्ण दिसत असून मागील काही दिवसांतील हे नेहमीचे चित्र आहे.

Next
ठळक मुद्दे वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील चित्र डॉ. तुषार भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणामलोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतक्रारींकडे दुर्लक्ष, गोरगरीब रुग्णांना डॉक्टरची प्रतीक्षा!

प्रकाश काळे 

वैभववाडी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.

शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयांमधील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ खासगी वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले असून त्यांना बाह्यरुग्ण तपासणीसाठी दरमहा सुमारे ४५ रुपये शासन मोबदला देत आहे.

त्यांचा बाह्यरुग्ण तपासणीचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ५ आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांत डॉ. भागवत एकदाही पूर्णवेळ रुग्णालयात थांबले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. भागवत वेळेवर रुग्णालयात उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे सर्व रुग्ण तपासत होते.

परंतु, डॉ. भागवत नेहमीच ११ च्या सुमारास रुग्णालयात येऊ लागल्यामुळे डॉ. कांबळे यांनी डॉ. भागवत यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तपासणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून सकाळी ९ वाजता रुग्णालयात येणारे गोरगरीब रुग्ण डॉ. भागवत यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे शासनाला अपेक्षित आहे. परंतु, डॉ. भागवत यांची रुग्णालयात सोयीने जेमतेम तासभर उपस्थिती दिसते. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीकडे कुणीही लोकप्रतिनिधी गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

जमादारांवर आरोग्य खाते मेहेरबान

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची सूत्रे डॉ. मौलाना जमादार यांनी जानेवारी २०१७ मध्ये हाती घेतली. तेव्हापासून ते एकदाही तालुक्यातील रुग्णांच्या किंवा अन्य जनतेच्या नजरेस पडलेले नाहीत. नाही म्हणायला पगारासाठी किंवा कार्यालयीन सभेसाठी ग्रामीण रुग्णालयात नाहीतर ओरोसला ते हजेरी लावतात. त्यांचे वर्षभर नेमणुकीच्या ठिकाणी नसणे जिल्हा शल्य चिकित्सकांनाही माहीत आहे. तरीही रुग्णालयातून आॅनड्युटी वर्षभर गायब असलेल्या डॉ. जमादार यांच्यावर आरोग्य खाते मेहेरबान असल्याने त्यांचा पगार त्यांना वेळच्यावेळी मिळत आहे.

तक्रारींकडे दुर्लक्ष

डॉ. तुषार भागवत शासनाने नेमून दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मौलाना जमादार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, व्यक्तिगत हितसंबंधांमुळे डॉ. भागवत यांच्याबाबतीत कारवाईचे पाऊल उचलण्यास डॉ. जमादार टाळाटाळ करीत असल्याची रुग्णालय प्रशासनात कुजबुज आहे.

 

Web Title: Sindhudurg: The result of the medical officer Bhagwat Bhagwat in Vaibhavwadi rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.