सिंधुदुर्ग : प्रदूषणकारी प्रकल्पांना तीव्र विरोध  : मोहनराव केळुसकर, कोकण विकास आघाडीचे ३९ वे वार्षिक अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:49 PM2018-01-11T18:49:26+5:302018-01-11T18:55:16+5:30

Sindhudurg: Fast opposition to pollution projects: Mohanrao Keluskar, Konkan Vikas Aghadi's 39th Annual Convention | सिंधुदुर्ग : प्रदूषणकारी प्रकल्पांना तीव्र विरोध  : मोहनराव केळुसकर, कोकण विकास आघाडीचे ३९ वे वार्षिक अधिवेशन

सिंधुदुर्ग : प्रदूषणकारी प्रकल्पांना तीव्र विरोध  : मोहनराव केळुसकर, कोकण विकास आघाडीचे ३९ वे वार्षिक अधिवेशन

Next
ठळक मुद्देकोकण विकास आघाडीचे ३९ वे वार्षिक अधिवेशनसहा जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थिततेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकण भकासतरुणांनी विकासाचा गाडा चालविला पाहिजे

कणकवली : समृद्ध कोकणात नाणार (ता. राजापूर) परिसरात तेलशुद्धीकरणासारखे प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प लादल्यास आम्ही कोकणवासीय रस्त्यावर उतरुन उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाविरोधात तीव्र विरोध करू, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी दिला.

कोकण विकास आघाडीचे ३९ वे वार्षिक अधिवेशन मुंबईतील विक्रोळी येथील अस्मिता कला, वाणिज्य, विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या गगनगिरी महाराज सभागृहात झाले. यावेळी अध्यक्षपदावरुन केळुसकर बोलत होते.

यावेळी कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष बळीराम परब, चिटणीस प्रकाश तावडे, मनोहर डोंगरे यांच्यासह स्वागताध्यक्ष म्हणून ओम विद्यासंस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी केळुसकर पुढे म्हणाले की, कोकणातील हापूस आंब्याला जागतिक मानांकाचा दर्जा मिळाला आहे. काजू, नारळ, कोकम आदी फळांना भविष्यात अशाच प्रकारचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे.

या भूमीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व पिकांना खास असा वैशिष्ट्यपूर्ण दर्जा आहे. अशा या निसर्गाचे वरदान लाभलेल्या समृद्ध कोकणात प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प लादल्यास तीव्र विरोध करू, असा इशारा केळुसकर यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान पुरविले जाते. शेतकरी सारखी कर्जे घेतात. मात्र त्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही. दलाल त्यांची लूट करुन स्वत:ची तुंबडी भरतात.

हमीभाव मिळाल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. तसेच खरेदी-विक्री संघानी खरेदी करावी, असे सांगून ते म्हणाले की, कोकणातील युवापिढीने जागरुक राहून संघटित व्हावे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारून शेती आणि व्यवसायाकडे वळावे.

यावेळी मांडण्यात आलेल्या कोकण विकासाच्या ठरावांच्या चर्चेमध्ये मनोहर जाधव, विलास गांगण, जनार्दन जाधव, सीताराम सांडव, सुरेश गुडेकर, हेमचंद्र तेलुपवार, संभाजी काजरेकर, दत्ताराम डोंगरे, रमेश आंग्रे, संतोष वांजे, प्रभाकर जाधव, नरेंद्र म्हात्रे, श्रीपाद केसरकर, भरत गावकर, गणपत चव्हाण, बाळासाहेब सावंत, ज्योती वाळेकर आदींनी सहभाग घेतला होता.

यावेळी मंजूर करण्यात आलेले ठराव मुख्यमंत्र्यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्वागताध्यक्ष मधुकर नार्वेकर यांनी संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. सरचिटणीस पावसकर यांनी अहवाल सादर केला.

तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकण भकास

यावेळी मोहनराव केळुसकर यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा सुरक्षिततेसाठी सर्व मापदंड अमलात आणत असल्याने विजेसाठी आवश्यक आहे. म्हणून त्याचे समर्थन करताना भारतामध्ये अशाप्रकारच्या प्रकल्पामध्ये अणुऊर्जा भट्टी बांधणारे शास्त्रज्ञ अत्यंत कल्पकतेने तंत्रज्ञानाची जोड देऊन काम करतात. त्यामुळे १९५८ पासून भारतात बांधण्यात आलेल्या एकाही अणुऊर्जा प्रकल्पाची भट्टी कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवी चुकांमुळे फुटलेली नाही.

जगातील बहुसंख्य देशातील शास्त्रज्ञांनी या गोष्टीचे कौतुक केले आहे. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या प्रचंड मोठ्या अशा तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन निसर्गाचा समतोल बिघडणार आहे.

शेती, बागायतीसह मत्स्य व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. कोकण भकास व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रकल्प वाळवंटी भागात हलविणे संयुक्तिक ठरेल, असे सांगितले.

तरुणांनी विकासाचा गाडा चालविला पाहिजे

भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सावंत म्हणाले, कोकणामध्ये एखादी संस्था सतत ३९ वर्षे चालविणे म्हणजे शिवधनुष्य पेलल्यासारखेच आहे. मोहनराव केळुसकर ही व्यक्ती म्हणजे केवळ विचार नाही तर ती चळवळ झाली पाहिजे. तरुणांनी अशा या सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होऊन विकासाचा हा गाडा अविरतपणे चालविला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Sindhudurg: Fast opposition to pollution projects: Mohanrao Keluskar, Konkan Vikas Aghadi's 39th Annual Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.