सिंधुदुर्ग जिल्हा विकास गट स्थापन

By admin | Published: March 15, 2017 11:05 PM2017-03-15T23:05:11+5:302017-03-15T23:05:11+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड; दगाफटका टाळण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Sindhudurg District Development Group established | सिंधुदुर्ग जिल्हा विकास गट स्थापन

सिंधुदुर्ग जिल्हा विकास गट स्थापन

Next



सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांनी दगाफटका करू नये यासाठीची खबरदारी म्हणून बुधवारी काँग्रेसच्या २७ व राष्ट्रवादीचा एक अशा २८ सदस्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर सिंधुदुर्ग जिल्हा विकास व उन्नती गटाची स्थापना केली आहे. गटनेते म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी किमान २६ जागांवर बहुमत मिळणे अपेक्षित आहे. असे असताना २१ फेब्रुवारीला पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने २७ जागा जिंकत जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली आहे, तर शिवसेना १६ व भाजप ६ असे मिळून २२ जागा विरोधी गटात आहेत. युतीने जरी सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या तरी त्यांना अजून चार सदस्यांची मदत लागणार आहे.
त्यामुळे २१ मार्चला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या सदस्यांनी बंडखोरी करू नये यासाठी काँग्रेसच्या २७ सदस्य व राष्ट्रवादीचा एक अशा एकूण २८ सदस्यांनी एकत्र येत बुधवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर सिंधुदुर्ग जिल्हा विकास व उन्नती गटाची स्थापना केली.
गटाची स्थापना केल्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेवर यावेळची पाचवी टर्म आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी सर्व सदस्य काम करणार आहोत. जनतेला अपेक्षित असणाऱ्या योजना सभागृहात मांडून त्याला मंजुरी घेण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी )सर्वांगीण विकासासाठी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करूया. जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकाऱ्यांनी अथवा लोकप्रतिनिधींनी चुकीची कामे केलेली नाहीत. विरोधकांनी केवळ आणि केवळ वृत्तपत्रांचा आधार घेत खोटे आरोप केले. त्यातील एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.
अध्यक्षपदासाठी महिला आरक्षण
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरिता राखीव असून, त्याचा कालावधी हा २१ मार्चपासून सुरू होऊन अडीच वर्षांच्या कालावधीकरिता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी पहिली बैठक २१ मार्चला दुपारी तीन वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत कार्यालयाकडून ७ मार्चला नोटिसा संबंधित तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती यांनी २१ मार्चला दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले आहे.

Web Title: Sindhudurg District Development Group established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.