Sindhudurg: लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:33 AM2024-03-05T11:33:51+5:302024-03-05T11:34:55+5:30

अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून घेतले ताब्यात

Seven arrested in a gang that cheated on the pretense of marriage in Sindhudurg | Sindhudurg: लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात अटकेत

Sindhudurg: लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात अटकेत

कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) : लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन पुरुष व नवरीसह चार महिलांना कुडाळ पोलिसांनी अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. संशयित टोळीने कुडाळ तालुक्यातील एकाचे लग्न लावून त्यानंतर नवरी पळून गेली. लग्नासाठी सुमारे १ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

कुडाळ पोलिस ठाण्यात ४२ वर्षीय तक्रारदार यांनी तक्रार दिली होती की, ते गेल्या चार वर्षांपासून लग्नाकरिता स्थळ पाहत होते. एक महिन्यापूर्वी अझिज नाईक (रा. माणगाव, ता. कुडाळ) व महेश पाटकर (रा. पाट दळवीवाडी, ता. कुडाळ) यांनी कुडाळ कोर्टाजवळील पाटेश्वर मंदिरात तक्रारदारास बोलावून अझिज नाईक याने चार पुरुष व महिलांना आणून मुलगी दाखवली. तिचे नाव रुपाली दत्ताजी पाटील असल्याचे सांगितले. तसेच, इतर आरोपींची ओळख त्या मुलीचे नातेवाईक म्हणून करून दिली. लग्नकार्यासाठी १ लाख ४० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले.

त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी हुमरमळा वालावल येथे रुपाली पाटील हिच्याशी धार्मिक पद्धतीने लग्न लावून दिले. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी तक्रारदार लग्न केलेल्या युवतीसह घरी आले. दुपारनंतर रुपाली पाटील ही घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर तक्रारदार यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

या प्रकरणातील नवरी मुलीसह संशयित विशाल मच्छिंद्र थोरात ( ३४, रा. उंदीरगाव रस्ता, गोडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर,) तसेच माधुरी प्रभाकर केदारी उर्फ भारती मदन ठोंबरे (३२, रा. संजयनगर, सूतगिरणी गेट, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) , संतोष दौलू काकडे ( ३७, रा. शिरोली, ता. करवीर जि. कोल्हापूर), संतोष गणाजी जगदाळे (४०, रा. दहीवडी, ता. माण, जि. सातारा), ज्योती संतोष शेलार ( ४३, रा. ता. वाई, जि. सातारा), मंगल संजय महापुरे (४८, रा. हेर्ले, हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेतले आहे.

Web Title: Seven arrested in a gang that cheated on the pretense of marriage in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.