ही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:40 AM2019-03-04T10:40:34+5:302019-03-04T10:43:35+5:30

शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने बेरोजगारांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या या फसव्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

This is a mockery of Shiv Sena: Nitesh Rane's criticism | ही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे यांची टीका

ही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे यांची टीका

ठळक मुद्देही तर शिवसेनेकडून बेरोजगारांची थट्टाच : नितेश राणे रोजगार मेळावा रद्द प्रकरणी नितेश यांची टीका

कणकवली : शिवसेनेने कणकवलीत आयोजित केलेला रोजगार मेळावा खासदार विनायक राऊत यांनी अचानक रद्द करून जिल्ह्यातील तरुणांची एकप्रकारे थट्टाच केली आहे. यानिमित्ताने शिवसेनेने बेरोजगारांची फसवणूक केली आहे. शिवसेनेच्या या फसव्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमान पक्ष कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत , युवक स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, कलमठ सरपंच देविका गुरव , जितेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्या हेलन कांबळी , संजीवनी पवार आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सकाळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर रोजगार मेळाव्याची घोषणा केली होती. तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी रोजगार मेळाव्याच्या मंडप उभारणीचा नारळही फोडला होता. पण कंपन्यांनी नकार दिल्यामुळे रोजगार मेळावा रद्द करण्याची नामुष्की संध्याकाळी शिवसेनेवर ओढवली.

एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी रोजगार मेळावा जाहीर करतात तर दुसरीकडे रद्द झालेल्या या मेळाव्याबद्दल बेरोजगारांची साधी दिलगिरीही व्यक्त करत नाहीत.याला काय म्हणावे ? असा प्रश्न आमदार राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, खासदार राऊत यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे. काहीही केले तरी आम्हालाच मते मिळणार अशा गुर्मीत शिवसेनावाले आहेत. ते जनतेला गृहीत धरीत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री शिवसेनेचे असतानाही त्यांना रोजगार मेळावा रद्द करावा लागतो ही नामुष्की आहे. यातूनच खासदार राऊत यांची पात्रता जिल्हावासीयांना दिसून आली आहे. राणे कुटुंबियांवर फक्त टीका करून मातोश्रीच्या कृपेने आपली खासदारकी टिकवायची एवढेच काम ते करीत आहेत.

मागील ५ वर्षांत विनायक राऊत यांनी रोजगाराभिमुख एकही प्रकल्प सिंधुदुर्गात आणलेला नाही. तसेच एखादा कारखाना किंवा प्रस्तावित असलेली दोडामार्ग आडाळी येथील एम.आय.डी.सी.ही ते आणू शकलेले नाहीत.

सिंधुदुर्गात शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार असताना आणि त्यांना सत्ता देऊनही सिंधुदुर्गवासीयांना नेमके काय मिळाले ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. मागे झालेल्या डंपर आंदोलनात कर्जात बुडालेल्या डंपर मालकांनाही शिवसेनेने वाऱ्यावर सोडले होते. त्यांना कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याने संरक्षण दिले नाही.

खंबाटा प्रकरणात तर विनायक राऊत यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तसेच न्याय मिळण्यासाठी कामगार इकडून तिकडे धावपळ करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता याचा हिशोब चुकता केल्याशिवाय रहाणार नाही. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

नाणार रद्दचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये!

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचे श्रेय शिवसेनेने घेण्या अगोदर जैतापूर प्रकल्पाच्या बाबतीत काय झाले होते? याचा आधी विचार करावा. राजापूर तसेच देवगड तालुक्यातील ग्रामस्थांनी एकजूट दाखवून हा प्रकल्प रद्द करून घेतला आहे. तो कोणी रद्द केलेला नाही. या प्रकल्पासाठी जागा विनायक राऊत यांनीच सुचविली होती.

तसेच तेथील प्रकल्पबाधितांना योग्य प्रमाणात मोबदला मिळावा यासाठी आमदार राजन साळवी शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मग हा प्रकल्प कोणाला हवा होता हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे प्रकल्प रद्द होणे हा जनतेचा विजय आहे. त्याचे श्रेय शिवसेनेने घेऊ नये. असे यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले.

आम्ही 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत !

शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यापूर्वीही नाणार प्रकल्प रद्दची घोषणा केली होती. मात्र, त्यांनंतरही भूमिसंपादनाचे काम थांबले नव्हते. आताही तसेच होऊ शकते. एन्रॉन
प्रकल्पासारखेही परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेने विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न आहे. आम्हीही 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहोत. नाणारसाठी घेतलेल्या जमिनीवरील शेरा उठला पाहिजे.तरच प्रकल्प खऱ्या अर्थाने रद्द झाला असे म्हणता येईल.असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
 

Web Title: This is a mockery of Shiv Sena: Nitesh Rane's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.