ठळक मुद्देरात्रीच्यावेळी मतदान यंत्रात बदल : भरत, श्वेतांगी मणचेकरबॅलेट युनिटवर सील नसल्याने सर्व प्रक्रिया संशयास्पदराज्य निवडणूक आयोगाकडे पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करणार उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार

मालवण , दि. १९ :  तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या झालेल्या मतमोजणीच्यावेळी प्रभाग क्रमांक दोनच्या मतदान यंत्रावर सील नसल्याचे आढळून आले. ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानीही मान्य केली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी मतदान यंत्रात बदल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत देवबाग ग्रामपंचायतीची फेर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी डॉ. भरत मणचेकर व श्वेतांगी मणचेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याने याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करणार असून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही मणचेकर यांनी सांगितले.


मालवण येथील हॉटेल सागरकिनारा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी भरत मणचेकर, श्वेतांगी मणचेकर, रंजिता उपरकर, अमृत राऊळ, दया राऊळ, ब्रेसिला लुद्रिक, शुभांगी सारंग, अपर्णा धुरी, मॅलविन फर्नांडिस आदी उमेदवार उपस्थित होते. मणचेकर म्हणाले, काल शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

देवबाग येथील प्रभाग क्रमांक दोनची मतमोजणी सुरू असताना बॅलेट युनिटला स्वाक्षरी असलेले सील नसल्याचे दिसून आले. प्रभाग क्रमांक तीनच्या बॅलेट युनिटला सीलच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण तसेच भाजपच्या उमेदवारांनी याला आक्षेप घेतला.

युनीटवरील सील तसेच पट्टी बदलली असल्याचे दिसून आल्याने या यंत्रात बदल करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे मतमोजणी थांबवून पेट्या न्यायालयात नेण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी आक्षेप अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आले. यावेळी तहसीलदारांनी तुम्ही कायदा हातात घेऊ नका असे सांगत पोलिसांमार्फत आमच्यावर दबाव टाकण्यात आला.


आमचे म्हणणे ऐकून न घेताच मतमोजणीची प्रक्रिया उरकण्यात आली. आमच्या आक्षेप अर्जावर खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी सील नसल्याचे मान्य केले असून तसे लेखी पत्रही दिले आहे. त्यामुळे यंत्रात बदल केला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे देवबागची ग्रामपंचायतीची पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करणार आहोत तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मतदान यंत्रे ही प्रत्यक्षात ट्रेझरीत ठेवणे आवश्यक असताना ती शासकीय तंत्रनिकेतन येथे ठेवण्यात आली. त्यामुळे रात्रीच्यावेळी युनिट उघडून मते बदलण्यात आल्याचा संशय मणचेकर यांनी व्यक्त केला. मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालातही आपल्याला जास्त मतदान झाले असताना कमी मतदान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यावेळीही यंत्रात बदल झाल्याचा संशय आहे. अशी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून यापुढील निवडणुकीची मतदान यंत्रे शासकीय तंत्रनिकेतन येथे न ठेवता ट्रेझरीत ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.


देवबाग ग्रामपंचायतीच्या बॅलेट युनिटवर सील नसल्याने ही सर्व प्रक्रिया संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तहसीलदार, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची याप्रकरणी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.