सिंधुदुर्ग : कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:15 PM2018-12-20T12:15:21+5:302018-12-20T12:17:10+5:30

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणुन गटविकास अधिकाऱ्यांनी काय लक्ष घातले ? एवढा खर्च कशा कारणासाठी झाला असा आक्षेप पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे यांनी घेत गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Kankavali Panchayat Samiti's group development officer Dharever! | सिंधुदुर्ग : कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धारेवर !

सिंधुदुर्ग : कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धारेवर !

Next
ठळक मुद्देकणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धारेवर ! कणकवली पंचायत समिती सर्वसाधारण सभा

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील सहा महीने बंद असलेली रुग्णवाहीका ५३ हजार ९५ रुपये खर्च करुन सुरु करण्यात आली होती. खर्च केल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच रुग्ण नेताना ही रुग्णवाहीका बंद पडली. त्यानंतर महीना उलटला तरी त्या रुग्णवाहीकेचे काम झालेले नाही. रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष म्हणुन गटविकास अधिकाऱ्यांनी काय लक्ष घातले ? एवढा खर्च कशा कारणासाठी झाला असा आक्षेप पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे यांनी घेत गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कणकवली पंचायत समिती सर्वसाधारण सभा सभापती सुजाता हळदिवे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. या सभेला उपसभापती सुचिता दळवी, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, मंगेश सावंत, हर्षदा वाळके यांच्यासह तालुक्यातील पंचायत समिती सदस्य व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीला गैरहजर राहीलेल्या खातेप्रमुखांची हजेरी घ्यावी अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांनी केली. त्या पडताळणीत सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, वीजवितरण, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अन्य काही विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहील्याचे उघड झाले. या गैरहजर राहणाऱ्या खातेप्रमुखांची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली.

सेस फंड खर्च करण्याबाबत यापुर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. मग हा सेस फंड खरेदीचा विषय मंजुरीसाठी का ठेवला? अशी विचारणा माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केली. त्याचबरोबर या सेस फंडाच्या लाभार्थ्यांची यादी झाली आहे का? असाही प्रश्न त्यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी अद्यापही यादी तयार करण्यात आली नसल्याचे सांगितले.

त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अंगणवाडीमधील कुपोषीत बालकांबाबत आढावा सभागृहात सादर करण्यात आला. त्यात कमी वजनाची २१ बालके होती. त्यांना डोस सुरु करण्यात आले असुन त्यातील ५ बालकांच्या वजनात वाढ झालेली आहे. अंगणवाडीमधील २० बिले ग्रामपंचायतने भरावीत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यावर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान भाग्यलक्ष्मी साटम यांनी ग्रामपंचायतकडे फंड अपुरा असल्यामुळे ही विज देयके ग्रामपंचायतना भरणे शक्य नाही. त्यामुळे ही अंगणवाडीमधील विज देयके शासनाने भरावीत असा ठराव घेण्याची मागणी केली. तो ठराव सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी ७८ अंगणवाडीमध्ये विज नसल्याचे उघड झाले.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात आतापर्यंत तालुक्यातील गोवर-रुबेरा लसीकरण २२ हजार मुलांना करण्यात आलेले आहे. विविध आठ टिम या लसीकरणाच्या मोहीमेत काम करत आहेत. खारेपाटण-कांजिर्डे भागात एकही विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही. त्याठिकाणी पुन्हा नव्याने जनजागृती करण्यात येणार आहे.

वागदे बीएसएनएलचा टॉवर बदलण्याबाबत ग्रामस्थांची मागणी आहे. त्यावर प्रशासनाने काय केले? अशी विचारणा मिलिंद मेस्त्री यांनी केली. त्यावर उत्तर देताना बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्या टॉवरची जागा बदलण्यात येत असल्याचे आश्वासन दिले.

खारेपाटण येथील शाळेचे बांधकाम करताना ठेकेदाराने कमी जाडीचे ग्रील बसविले आहेत. त्याचे बिल अदा करु नये अशी मागणी पंचायत समिती सदस्यांनी केली. त्यावर जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंत्यांनी जोपर्यंत काम योग्य होत नाही. तोपर्यंत बिल अदा करणार नसल्याचे आश्वासन दिले.

पंतप्रधान आवास योजना, प्लास्टिक बंदी, स्ट्रीट लाईटची बिले १४ वा वित्त आयोग निधीचा खर्च व अन्य विषयांवर या सभेत चर्चा झाली. पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत व अन्य सर्व सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला होता.

Web Title: Kankavali Panchayat Samiti's group development officer Dharever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.