धनगर समाज ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

By admin | Published: March 23, 2015 09:06 PM2015-03-23T21:06:34+5:302015-03-24T00:16:56+5:30

दोडामार्गातील स्थिती : योजनांची पूर्तता हवी

Dhangar Samaj waiting for 'good days' | धनगर समाज ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

धनगर समाज ‘अच्छे दिन’च्या प्रतीक्षेत

Next

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग  तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या समाजाकडे स्वत:ची जमीन नसल्यामुळे त्यांना राहण्याची पक्की घरे नाहीत. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. जीवनावश्यक सुविधा नाहीत. रस्ते नाहीत. अशा बिकट परिस्थितीत धनगर समाज जगत आहे. देश स्वतंत्र झाला, तरी धनगर समाज मात्र अजूनही आदिवासी आहे. त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार, स्वत:ची घरे कधी मिळणार, हा त्यांच्यापुढील सर्वांत मोठा प्रश्न उभा आहे.
सावंतवाडी-दोडामार्ग राज्यमार्गावर सासोलीच्या सड्यावर धनगर वस्ती वसलेली आहे. याठिकाणी या धनगर लोकांच्या पिढ्या गेल्या. तरीही याची घरस्वप्नांची, विजेचे स्वप्न पूर्ण कधी होणार याबद्दल त्यांना कोणतीच शाश्वती नाही. घरावर कौले पडतील का, स्वत:ची जमीन म्हणून पाय ठेवीन काय? स्वत:च्या जमिनीत चार दाणे भाताचे पिकवीन काय, या प्रश्नांनी हा धनगर समाज त्या वळणावरून सतत फिरणाऱ्या मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या गाड्यांकडे डोळे टिपून बसला आहे. आज ६५ वर्षे झाली. एवढे पालकमंत्री, आमदार, खासदार, व्हीआयपी अधिकारी यांची केव्हाच नजर त्या करडाच्या झोपडीवर पडली नाही. गावकरीसुद्धा भेटत नाहीत. कारण संबंधित जमीनदार के व्हा येऊन घर काढायला सांगेल, याची भीती सतत असते. घराची वणवण, अंधकाराचा उजेड केव्हा पडेल, पाण्याची दोन किलोमीटरची पायपीट केव्हा संपेल, हा प्रश्न पडला आहे. या प्रश्नांच्या उत्तरांची धनगर समाज वाट पाहत आहे.
मोदी सरकारने २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देणार, असे सांगितले. पण, या धनगर वस्त्यांना अच्छे दिन येतील, असे वाटत नाही. कारण घरासाठी आवश्यक असलेली जमीनच नाही, तर घर कसे बांधणार? यासाठी किती वर्षे जातील, असे अनेक प्रश्न धनगर समाजासमोर उभे आहेत. तालुका धनगर समाजोन्नती मंडळाने या धनगर वस्त्यांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. धनगर समाजाच्या समस्या आमदार, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मंडळाचे अध्यक्ष सखाराम झोरे, भैरू वरक, महेश काळे, चिन्मय पटकारे यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत संतोष पटकारे, सिद्धेश पटकारे, लक्ष्मण गावडे, जनार्दन गावडे, विठू बोडेकर, आदी उपस्थित होते.

इतर धनगर वस्तींमधील अवस्था
आडाळी धनगर वस्तीत सुमारे ३० कुटुंबे असून, एकूण लोकसंख्या १४० आहे.
त्यात २० कुटुंबे भूमिहीन आहेत. ग्रामपंचायतीपासून धनगरवस्तीपर्यंत जायला
रस्ता नाही, अशी बिकट अवस्था आहे.
घर, जमीन नसल्यामुळे आदिवासींप्रमाणे जीवन जगत आहेत.
फुकेरी येथील धनगर कुटुंबांना भर रात्री काही गावकऱ्यांनी मारहाण करून पळवून लावले होते, असे सखाराम झोरे यांनी सांगितले.
भेकुर्ली येथील धनगर जंगलात राहतात. निडली, भेकुर्ली तसेच अनेक वस्त्यांमधील धनगर भूमिहीन आहेत.
कोलझर येथील धनगर कुटुुंबांना पळवून लावल्याने त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
निवडणुकीवेळी प्रत्येक पक्षाच्या तोंडातून शब्द निघतात की, धनगर समाजाने एखादा शब्द दिला की फिरवत नाहीत. प्रामाणिक समाज आहे; परंतु आज या प्रामाणिक समाजातील एखाद्याचे निधन झाल्यास दहन करण्यासाठी साडेतीन हात जागासुद्धा नाही. प्रामाणिकपणाचे हेच बक्षीस आहे काय? पालकमंत्री म्हणतात, माझा मतदारसंघ देशातील श्रीमंत मतदारसंघ बनविणार. धनगर वस्त्यांच्या अशा समस्यांनी मतदारसंघ श्रीमंत बनेल काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांनी धनगर समाजाच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्यात.
- सखाराम झोरे,
धनगर समाजबांधव

Web Title: Dhangar Samaj waiting for 'good days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.