कार जाळली, सावंतवाडीतील घटनेचा काँग्रेससह भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:10 PM2019-03-13T13:10:34+5:302019-03-13T13:13:55+5:30

महाराष्ट्र स्वाभिमानचे पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभी करून ठेवलेली त्यांची स्वत:ची इनोव्हा कार सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Car burns, Sawantwadi incidents, Congress protest with Congress | कार जाळली, सावंतवाडीतील घटनेचा काँग्रेससह भाजपकडून निषेध

कार जाळली, सावंतवाडीतील घटनेचा काँग्रेससह भाजपकडून निषेध

Next
ठळक मुद्देस्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांची कार जाळली, सावंतवाडीतील घटनेने जिल्ह्यात खळबळअज्ञातांचे कृत्य, कारजवळ रॉकेलचा कॅन, दारूची बाटली, चकल्याची पॅकेट

सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमानचे पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे राहत असलेल्या इमारतीच्या खाली उभी करून ठेवलेली त्यांची स्वत:ची इनोव्हा कार सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी जाळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसात हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण तापले असून, परब यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार जळताना जवळच रॉकेलचे कॅन तसेच दारूची बाटली व चकल्याची पिशवी पोलिसांना आढळून आली आहे. त्यामुळे हे कृत्य मद्यपी व्यक्तीने केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. कार जळाल्याने परब यांचे १७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब हे सोमवारी दिवसभर पक्षीय बैठका तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन खासकिलवाडा येथे आपल्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी आपली कार बिल्डींगच्या खाली उभी करून ठेवली होती.

घरात छोटासा कार्यक्रम असल्याने ते कार्यक्रमात व्यस्त होते. त्याच वेळी बाहेर रात्री १ च्या सुमारास मोठा कसला तरी आवाज झाला म्हणून परब हे बाहेर आले, तेव्हा खाली त्यांची कार जळत होती. कारचा पुढच्या भागाने पेट घेतला होता. त्यामुळे परब यांनी तातडीने अग्निशामक बंब बोलावला. मात्र, घराचा रस्ता चुकल्याने बंब दुसरीकडेच गेला.

शहरात गस्त घालणारे पोलीस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आली, मात्र बराच उशीर झाल्याने आगीत पूर्णत: कार जळून खाक झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच जो कोणी कृत्य करणारा असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असे स्पष्ट केले. घटनेनंतर पोलीस ३५ मिनिटे उशिरा आल्याबद्दल परब यांनी नाराजी व्यक्त केली.

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव, हेडकॉन्स्टेबल संतोष हुबे, मंगेश शिगाडे, किरण कांबळी, अर्जुन गवस आदी गस्त घालून आरोपींचा शोध घेत होते.

चार वर्षात तिसरी घटना

संजू परब ज्या साई दीपदर्शन इमारतीमध्ये राहतात, त्या इमारतीच्या खाली लावण्यात आलेल्या दुचाकी तसेच आता कार जाळण्याचा हा तिसरा प्रकार आहे. चार वर्षांपूर्वी इमारतीच्या खाली असलेल्या दोन ते तीन दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर परब यांच्या पत्नीची ही दुचाकी जाळण्यात आली होती. त्यातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. त्यातच संजू परब यांची कारच जाळण्यात आल्याने हा गेल्या चार वर्षातील तिसरा प्रकार आहे.

घडलेला प्रकार निंदनीयच : बबन साळगावकर

सावंतवाडी शहरात गाडी जाळण्याचे प्रकार यापूर्वी कधीही झाले नाहीत. प्रथमच ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडत आहेत. हे कोणी कृत्य केले आहे ते निंदनीयच आहे. असा प्रकार कोणाच्याबाबतही होऊ नये, यासाठी पोलिसांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. त्या शिवाय शहरात पोलीस गस्त वाढवली पाहिजे. असे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. तसेच संजू परब यांच्या घरी जाऊन त्यांची भेटही घेतली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर उपस्थित होते.

काँग्रेससह भाजपकडून घटनेचा निषेध

सावंतवाडी शहरात गाडी जाळण्याचे प्रकार यापूर्वी कधी घडला नाही. पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडला. याचा निषेध काँग्रेसचे बाळा गावडे यांनी परब यांची भेट घेऊन केला. तसेच माजी आमदार राजन तेली यांनीही घटनेचा निषेध करत आरोपीवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे तेली यांनी केली आहे.

 

Web Title: Car burns, Sawantwadi incidents, Congress protest with Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.