सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 27, 2024 06:13 PM2024-03-27T18:13:08+5:302024-03-27T18:13:53+5:30

कुडाळ येथील युवा कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर टीका

Attempt to handover Konkan to foreigners behind CIDCO, Vinayak Raut allegation | सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

कुडाळ (सिंधुदुर्ग) : आता हे सरकार कोकणात सिडकोला आणून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देऊ पाहत असल्याचा आरोप खासदार तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयाचा पताका फडकविण्यासाठी आता युवासेना कार्यरत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. युवाशक्तीच्या ताकदीवर विश्वास आहे, युवाशक्तीने देशाची लोकशाही वाचविण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन युवा पिढीला राऊत यांनी केले.

इंडिया आघाडीच्यावतीने कुडाळ येथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्राचा युवा महाराष्ट्रभिमान मेळावा खासदार विनायक राऊत, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार वैभव नाईक, राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक, रूची राऊत, विक्रांत जाधव, वरुण जाधव, रूपेश कदम, काँग्रेस युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रूपेश जाधव, आप युवक जिल्हाध्यक्ष आदित्य बटवाले, अथर्व साळवी तसेच जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला प्रदेश सरचिटणीस जान्हवी सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही वाचविण्याची युवा पिढीवर जबाबदारी

वरुण सरदेसाई म्हणाले, भाजपाने कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे भाजपकडेे अपयशाचा पाढा आहे. देशातील सध्याच्या स्थितीनुसार ही लोकसभेची शेवटची निवडणूक होऊ शकते, कारण भाजप देशाची लोकशाही संपवू पाहत आहे. त्यामुळे लोकशाही वाचविण्याची मोठी जबाबदारी युवा पिढीवर आहे.

आम्ही निष्ठावंत 

यावेळी आमदार राजन साळवी म्हणाले, या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायचा आहे, माझ्यासह, कुटुंबीयांवर चौकशी लावून दबाव टाकला गेला, पण आम्ही निष्ठावंत आहोत.

ही राणेंची राजकीय अधोगती

एकीकडे भाजपाचे मंत्री नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण व गद्दारांचे नेते दीपक केसरकर, उदय सामंत असे चार जण कोकणातील मंत्री असूनही या मतदारसंघाचा प्रचार प्रमुख गोव्याचे मुख्यमंत्री यांना केले, कारण या चारही जणांवर भाजपाचा विश्वास नसावा असा. तर, भाजपकडून अजूनही नारायण राणे यांना उमेदवारी दिली जात नाही ही, राणे यांची राजकीय अधोगती आहे. या मेळाव्याला तुडुंब गर्दी झाली तर, कुडाळमध्ये उदय सामंत यांच्या मेळाव्यात पैसे न मिळाल्याने भांडणे सुरू होती, असा टोला शिंदे गटाला नाईक यांनी लगावला.

Web Title: Attempt to handover Konkan to foreigners behind CIDCO, Vinayak Raut allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.