राजेंच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा बागुलबुवा -- उदयनराजेंच्या उमेदवारीला उघड विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:28 PM2019-03-06T23:28:33+5:302019-03-06T23:29:41+5:30

दीपक शिंदे । सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही थांबण्यास तयार नाही. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे ...

Opposition to BJP's Bajulbua- Udayanrajeen's candidature from Raje's workers | राजेंच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा बागुलबुवा -- उदयनराजेंच्या उमेदवारीला उघड विरोध

राजेंच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचा बागुलबुवा -- उदयनराजेंच्या उमेदवारीला उघड विरोध

Next
ठळक मुद्देदबावाचे राजकारण : नेत्यांसाठी कार्यकर्ते मैदानात,, नेत्यांनाही समजदारीचा सल्ला

दीपक शिंदे ।
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही थांबण्यास तयार नाही. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते एकमेकांवर राजकीय दबाव टाकून स्वत:ची कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे करा नाहीतर भाजपमध्ये जातो...तसे करा नाहीतर भाजपमध्ये जातो, अशी भाजपची भीती दाखवून बागुलबुवा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आता भाजपचीच अवस्था माझा कुणा म्हणू मी... अशी झाली आहे.

नाराजांना जवळ करा आणि किल्ल्यात घुसूनच हल्ला करा, या नीतीने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने रचलेल्या चक्रव्यूहात एकेक नेता अडकल्याचा आभास निर्माण केला जात आहे. नेत्यांनी स्वत:हून रचलेले हे चक्रव्यूह स्वत:ची सुटका करून घेण्यासाठीच रचले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे खोटे कवच तयार केलं गेलंय. राजकीय दबावतंत्राचा हा एक प्रकार असला तरी तो कुठंपर्यंत चालणार, हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या या वातावरण निर्मितीमुळे जिल्ह्यातील एकेक मासा अलगद जाळ्यात पडू लागला आहे, असा भाजपचा समजही होण्याची शक्यता आहे; पण हा मासा कायम गळाला लागणार नाही, तर एका ठिकाणी होणारी घुसमट थांबविण्यासाठी नवीन जाळ्यात स्वत:ला टाकून श्वास घेण्यास पुरेसा वाव मिळाला की पुन्हा परतण्याच्या तयारीत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडून आपल्याला मदत होईल, असे दिसत नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी भाजपमध्ये जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर मंगळवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन उदयनराजेंना एवढा विरोध करूनही राष्ट्रवादी काँग्रेस ऐकणार नसेल तर स्वत: आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये जावे, अशी भूमिका घेतली आहे. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते नेत्यांच्या निवडून येण्याची आणि सन्मानाची काळजी करत आहेत; पण नेत्यांनी कधीच आपण भाजपमध्ये जाणार, असे म्हटलेले नाही. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे होणारे राजकीय डावपेच आहेत. त्यामुळे कधी मिसळ तर कधी गुप्त बैठका, कधी गाण्यातून सुचक इशारा, असा राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकण्याचाच प्रयत्न सुरू आहे.

भाजप सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहे. शहरी भागातील भाजप आता ग्रामीण भागातही जोरकसपणे पोहोचत असल्याने शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणार दुवा असा उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीत त्यांना काही उमेदवार सापडतीलही; मात्र निवडून येणारा उमेदवार भाजपच्या हाती लागणे गरजेचे आहे. स्वत:ची ताकद असलेला उमेदवार सहसा पक्ष सोडून जाण्यास धजावत नाही. पक्षालाही अशा उमेदवाराची ताकद माहिती असल्याने त्यालाही चुचकारण्याचाच प्रकार होतो. त्यामुळे आता भाजपच्या हाताला लागणाऱ्या उमेदवारांवर त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे.
नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याच पक्षावर दबाव टाकण्याचा प्रय-त्न केला असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय आणि साहेब म्हणतील तसे, असे मानणारा वर्ग राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे तो साहेबांसोबत जाणार की राजेंसोबत, हे देखील आगामी काळात स्पष्ट होईल.

भाजपमध्ये आयारामांची संख्या वाढतेय...
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपचेच सरकार पुन्हा येईल, असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत भाजपमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. निवडणुकीतील जागा एक किंवा दोन आणि इच्छुकांची संख्या डझनभर. अशा स्थितीमुळे माझा कुणा म्हणू मी, अशीच भाजपची स्थिती झाली आहे.

उदयनराजेंचा राजकीय फायद्यासाठी वापर
खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढले तर माढा मतदारसंघातील उमेदवाराचा विजय सोपा होईल, ही राष्ट्रवादीची रणनीती आहे. त्यामुळे उदयनराजेंना डावलून चालणार नाही, असे राष्ट्रवादीतील जाणकारांचे मत आहे. उदयनराजे इतर पक्षात गेले तर दोन्ही मतदारसंघ हातातून जाण्याची भीती असल्यामुळेच उदयनराजेंची उमेदवारी शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहणार आहे.

कार्यकर्त्यांचे दबावतंत्र उपयोगी पडणार का..?
खासदार उदयनराजे भोसले किंवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोन्ही नेते लगेच कुठेही जात नाहीत, हे सर्वांना माहिती आहे. फक्त कार्यकर्त्यांच्या पातळीवर दबाव टाकून आपल्या पदरात जेवढे पाडून घेता येईल तेवढे घेण्याचा हा प्रयत्न आहे.

स्थानिक पातळीवर स्वत: आणि कार्यकर्त्यांना सुरक्षित करून घेण्यासाठी ही व्यूहरचना आखली जात आहे. याची पक्षातील नेत्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे म्हणणे किती गांभीर्याने घेतले जाणार, हा प्रश्नच आहे. कारण उद्या उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजे यांनी राष्ट्रवादीत थांबण्याचा किंवा बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर कार्यकर्त्यांना सोबत राहावेच लागणार आहे.

Web Title: Opposition to BJP's Bajulbua- Udayanrajeen's candidature from Raje's workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.