शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 05:25 PM2023-10-13T17:25:00+5:302023-10-13T17:25:14+5:30

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी ...

As the work of Jaljivan water supply scheme of Shirwal did not start, 7 youths attempted self immolation | शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह ७ युवकांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आले.  

शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी शासनाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ४ कोटी ७२ लाख ८३ हजार ६६७ रुपये किमतीची जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दरम्यान, शिरवळ गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाच्या नियमावलीनुसार नवीन योजनेमध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रासाठी १० गुंठे व १.८० लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी २ गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीकडून जागा सूचित करण्यात आली होती. 

मात्र, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद उपविभाग, खंडाळा यांच्या पाहणीनंतर ही जागा शासकीय नियमावलीनुसार शिरवळसाठी अपुरी असल्याबाबत जागेची मोजमापे घेण्यात आल्यानंतर निदर्शनास आले. त्यानुसार उपअभियंता खंडाळा उपविभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सातारा जिल्हा परिषद यांचा अहवाल प्राप्त होताच याबाबत संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर ९४४ मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले होते. त्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी जनता फाउंडेशनच्या युवकांनी करीत खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू न झाल्यास गुरुवार, दि.१२ ऑक्टोबर रोजी शिरवळ ग्रामपंचायतसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. 

त्यामुळे शिरवळ ग्रामपंचायतीला शिरवळ पोलिसांच्या छावणीचे रूप येत सकाळी ८ वाजेपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जनता फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी, हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित आंदोलकांना ताब्यात घेण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: As the work of Jaljivan water supply scheme of Shirwal did not start, 7 youths attempted self immolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.