हज यात्रेकरूंची फसवणूक मिरजेतील प्रकार : मुंबईतील ट्रॅव्हल कंपनीकडून कोट्यवधी रूपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:27 AM2018-08-09T00:27:26+5:302018-08-09T00:27:38+5:30

मुंबईतील एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून शंभर हज यात्रेकरुंची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Types of Hazards of Haj Yatra: Types of Rupees From Travel Travel Company in Mumbai | हज यात्रेकरूंची फसवणूक मिरजेतील प्रकार : मुंबईतील ट्रॅव्हल कंपनीकडून कोट्यवधी रूपयांचा गंडा

हज यात्रेकरूंची फसवणूक मिरजेतील प्रकार : मुंबईतील ट्रॅव्हल कंपनीकडून कोट्यवधी रूपयांचा गंडा

Next

मिरज : मुंबईतील एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून शंभर हज यात्रेकरुंची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात्रेसाठी व्हिसा न मिळाल्याने हे हज यात्रेकरू हवालदिल झाले आहेत. फसवणूक झालेल्या यात्रेकरूंच्या तक्रारीमुळे मिरज शहर पोलिसांनी मुंबईतील संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटास पाचारण करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

हज हे पवित्रस्थळ असलेल्या सौदी अरेबियात हज यात्रेला जाण्यासाठी हज कमिटीकडून १ लाख ८० हजार व खासगी यात्रा कंपनीमार्फत सुमारे अडीच लाख खर्च आहे. हज यात्रेसाठी बकरी ईदच्या दिवशी यात्रेकरूंना मक्का येथे उपस्थिती असणे आवश्यक आहे. मिरजेतील एका ट्रॅव्हल्स एजंटाकडे हजसाठी सुमारे शंभर यात्रेकरूंनी नोंदणी करून रक्कम भरली होती. या सर्वच यात्रेकरूंनी हजला जाण्यासाठी सहा महिने अगोदरपासून तयारी सुरू केली होती. हज कमिटी आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्रतिवर्षी ठरवून दिलेल्या कोट्यानुसार व्हिसा देण्यात येतो. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी हज यात्रेकरुंना आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक शहरात कमिशन तत्त्वावर अनधिकृत एजंट नेमलेले आहेत. असे एजंट यात्रेकरूंना कमी दराचे व हज यात्रेत विविध सुविधांचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचा उद्योग करीत असतात. अशा पध्दतीने दरवर्षी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अनेक हज यात्रेकरूंच्या फसवणुकीचे प्रकारही वारंवार घडताना दिसतात. योग्य त्या माहितीअभावी अनेकदा यात्रेकरू अशा एजंटांच्या जाळ्यात अडकतात.

मुंबईतील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीसाठी काम करणाऱ्या मिरजेतील इरफान नामक अनधिकृत एजंटाने सहा महिन्यांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सुमारे शंभर हज यात्रेकरुंकडून प्रत्येकी अडीच लाख रूपये, अशी सुमारे अडीच कोटीची रक्कम घेतली आहे. मात्र, या एजंटाने ठरवून दिलेल्या वेळेत त्यांना व्हिसा उपलब्ध करून दिला नाही. यामुळे या शंभरावर यात्रेकरूंची फसवणूक झाली आहे.
पूर्वी नोंदणी केलेल्या शंभर जणांच्या व्हिसावर जादा पैसे घेऊन इतरांना हज यात्रेला पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने यात्रेकरुंनी दोन दिवसांपूर्वी एजंटाविरूध्द पोलिसात फसवणुकीची तक्रार केली आहे. हज यात्रेची तयारी केलेल्या यात्रेकरूंना ऐनवेळी व्हिसा मिळाला नसल्याचे कारण सांगण्यात आल्याने यात्रेकरु हतबल झाले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कंपनीविरोधात पोलिसात तक्रार
हजसाठी यात्रेकरुंनी तगादा लावल्याने, मुंबईतील ट्रॅव्हल्स कंपनीने फसविल्याचा पवित्रा घेत मिरजेतील एजंटाने एका नगरसेवकाच्या मध्यस्थीने मुंबईतील ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुंबईतील ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रतिनिधीस चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर त्यानेही हात वर केल्याने, यात्रेकरूंची यावर्षीची हज यात्रा चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Types of Hazards of Haj Yatra: Types of Rupees From Travel Travel Company in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.