लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:43 AM2018-08-10T00:43:42+5:302018-08-10T00:45:26+5:30

 Thirty-three agitation in the Maratha, disciplined Maratha Sangli station | लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन

लाख मराठा, शिस्तबध्द मराठा सांगलीच्या स्टेशन चौकात ठिय्या आंदोलन

Next
ठळक मुद्देसमाजबांधवांचा मोठा सहभाग; राज्य सरकारविरोधी घोषणा महिला व युवतींकडे दिले आंदोलनाचे संपूर्ण नेतृत्व

सांगली : ‘तुमचं-आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत गुरुवारी सांगलीतील स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. शहरासह परिसरातील गावांतून आलेले मराठा समाजबांधव व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सायंकाळी पाचपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते. शांत व संयमाने झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे मराठा समाजाने मूक मोर्चानंतर पुन्हा एकदा शिस्तीचे दर्शन घडविले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी क्रांतिदिनी संपूर्ण राज्यभर बंद व ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. सांगलीतही संपूर्ण व्यवहार बंद होते. सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढून कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील स्मारकासमोर समाजबांधव मोठ्या संख्येने जमा होत होते. पश्चिम भागातील काही गावांतून आलेले तरुणही मोटारसायकल रॅलीने सहभागी होत होते.

स्टेशन चौकात आलेल्या समाजबांधवांनी रस्त्यावरच ठिय्या मारला होता; तर अनेकजण आजुबाजूला थांबले होते. मात्र, ठिय्या आंदोलनात सहभागी महिलांनी ठिय्या आंदोलन असल्याने खाली बसण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वजण खाली बसले. आंदोलनादरम्यान वारंवार पावसाच्या सरी सुरू होत्या. पावसाची तमा न बाळगता मराठा समाज बांधव बसून होते. दिवसभरात चार ते पाचवेळा पावसाच्या सरी आल्या; परंतु ठिय्या आंदोलन कायम होते.
सकाळपासून सायंकाळी पाचपर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनात कुणीही भाषण केले नाही. तसेच उपस्थितांना सूचना देण्याची व घोषणा देण्याची सूत्रेही महिलांनी स्वत:कडे घेतल्याने आंदोलन शिस्तीत पार पडले. आंदोलनामुळे चौकात होणारी गर्दी लक्षात घेऊन आझाद चौकापासून राजवाडा चौकाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. दुपारनंतर ही वाहतूक सुरळीत झाली होती.

यावेळी आपल्या मागण्यांचे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यास शिष्टमंडळ जाणार होते, मात्र जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील हे स्वत: शहरात फिरून आंदोलनाचा आढावा घेत होते. त्यामुळे आंदोलनस्थळीच त्यांना उपस्थित महिलांनी निवेदन सादर केले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.

यावेळी डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, श्रीरंग पाटील, पद्माकर जगदाळे, आशा पाटील, सुजाता भगत, सुप्रिया घाडगे, प्रिया गोटखिंडे, कविता बोंद्रे, सुवर्णा माने, रूपाली राऊत, संगीता शिंदे, स्नेहा सावंत, रोहिणी पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेतेमंडळी आली : रस्त्यावरच बसकन मारली!
ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहरातील विविध भागातून व तालुक्यातील अनेक गावांतील मराठा समाजबांधव आले होते. पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरच सर्वांनी बैठक मारली होती. दुपारी आ. विश्वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, नामदेवराव मोहिते यांच्यासह अनेक नूतन नगरसेवकांनी आंदोलनस्थळी भेट देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सर्वच नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला होता. भर पावसात भिजतच दीड तासाहून अधिक काळ नेत्यांनी सहभाग दाखविला होता.

अशा आहेत मागण्या..
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचे धोरण वेळकाढूपणाचे आहे.
मेगा भरतीबाबतही सरकारची घोषणा फसवणूक करणारी असून यामुळे राज्यातील समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.ठिय्या आंदोलनस्थळी उपस्थित महिलांनी हे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.

Web Title:  Thirty-three agitation in the Maratha, disciplined Maratha Sangli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.