सांगली  : जलयुक्त शिवार : कामे मार्च 2019 पूर्वी पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा :  डवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:54 PM2018-04-06T15:54:41+5:302018-04-06T15:54:41+5:30

जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम आहे. अभियानांतर्गत प्रलंबित कामे एप्रिलअखेर पूर्ण करा, असे आदेश मृद, जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.

Sangli: Water tanker: Perform micro-planning to complete works before March 2019: Dewale | सांगली  : जलयुक्त शिवार : कामे मार्च 2019 पूर्वी पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा :  डवले

सांगली  : जलयुक्त शिवार : कामे मार्च 2019 पूर्वी पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा :  डवले

googlenewsNext
ठळक मुद्देजलयुक्त शिवार : कामे मार्च 2019 पूर्वी पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा :  डवलेजिल्हा नियोजन समिती सभागृहात जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत

सांगली  : जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत सन 2018-19 साठी आवश्यक ती कार्यवाही करत, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता वेळेत घ्या. पुढील वर्षी मार्चपूर्वी सर्व कामे 100 टक्के पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवावा. तसेच, अभियानांतर्गत प्रलंबित कामे एप्रिलअखेर पूर्ण करा, असे आदेश मृद, जलसंधारण व रोजगार हमी योजना विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.



येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पुणे विभागीय (रोहयो) उपायुक्त अजित पवार, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आवटी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये गतवर्षीच्या 140 पैकी 138 गावांमध्ये 100 टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून सचिव एकनाथ डवले म्हणाले, सन 2018-19 साठी जलयुक्त शिवार अभियान दोन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल ते 30 जून 2018 या कालावधीत पहिला टप्पा आणि पावसाळ्यानंतर 1 नोव्हेंबर 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे.

गत वर्षातील प्रलंबित कामे पूर्ण करतानाच समांतरपणे सन 2018-19 च्या गावांची निवड, गाव आराखडे, हाती घेण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन करा. प्रशासकीय मान्यता घेऊन जूनपूर्वी 20 ते 25 टक्के कामे पूर्ण करावीत. यामध्ये प्रामुख्याने पाझर तलाव, गावतलाव, सिमेंट नाला बांध आदि कामे हाती घ्यावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, दुरूस्तीच्या कामांसाठी जिल्हा नियोजन विभागाकडून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2016-17 मध्ये आराखड्यानुसार 4 हजार, 773 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 756 कामे पूर्ण झाली असून, 17 प्रगतीपथावर आहेत. ती महिनाअखेर पूर्ण करण्यात येतील.

राजेंद्र साबळे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषि विभाग व अन्य विभागांनी केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. तर किरण कुलकर्णी यांनी नरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, वॉटर कप स्पर्धा यांची माहिती दिली.

यावेळी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रलंबित कामे, जिओ टॅगिंग, उपलब्ध निधी, लक्षांक, उपचारनिहाय कामे, लोकसहभागातून झालेली कामे, सन 2017-18 मधील कामांच्या पूर्णत्वाची सद्यस्थिती, निर्मित जलसाठा क्षमता, संरक्षित सिंचन क्षेत्र, सन 2017-18 मधील आराखड्यानुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, मागेल त्याला शेततळे, विहिरी पुनर्भरण, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, नरेगातून विहिरींची कामे, वॉटर कप स्पर्धा आदिंचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


प्रास्ताविक राजेंद्र साबळे यांनी केले. आभार अण्णासाहेब चव्हाण यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वन, छोटे पाटबंधारे, यांत्रिकी व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: Sangli: Water tanker: Perform micro-planning to complete works before March 2019: Dewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.