ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - महाराष्ट्र सरकारने शेतांमध्ये, शिवारात पाणी मुरण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणले, पण मागील वर्षी गडबड झाली. माथा ते पायथा असे तांत्रिकदृष्टय़ा योग्य काम झालेले दिसत नाही. जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल, पण योग्य अभियांत्रिकीचा अवलंब करून आणि ठेकेदारांपासून ही योजना दूर करून लोकांच्या हातात द्यावी, लोकांचा मोठा सहभाग यात वाढावा. यासोबत लोकांची मागणी लक्षात घेता या अभियानात सेंद्रीय शेतीचा अंतर्भाव करता येईल का, याचाही विचार व्हावा, असे आवाहन जागतिक जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत शनिवारी केले.
विद्यापीठातील पदवीप्रदान सभागृहात ही कार्यशाळाशनिवारी झाली. व्यासपीठावर पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.माधवराव चितळे, स्वच्छता दूत भारत पाटील (कोल्हापूर),  हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा उज्‍जवला पाटील, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहंमद हुसेन खान, महापौर नितीन लढ्ढा, खासदार ए.टी.पाटील, रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, प्रा.चंद्रकांत सोनवणे, स्मिता वाघ,  जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक एम.आदर्श रेड्डी, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील आदी उपस्थित होते.

मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळ
फक्त महाराष्ट्र दुष्काळी स्थितीत आहे, असे नाही. देशात पाच राज्यांमध्ये दुष्काळ आहे. मागील काळापेक्षा 10 पट भीषण दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत नदी पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले पाहिजे. मध्य प्रदेशात हे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातही जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. मी सरकारचे अभिनंदन करीन. पण ही योजना तांत्रिकदृष्टय़ा व्यवस्थित राबवावी, ठेकेदारांपासून दूर करावी, असे राजेंद्रसिंह म्हणाले.
आज जे पाणी हडपतात, दूषित करतात त्यांना मुभा
इतिहासात किंवा पूर्वीच्या काळात देशात पाण्यासाठी व्यापारी, राजे हे मोठी संपत्ती द्यायचे. त्याची कुठली नोंद त्यांच्या सामाजिक उपक्रमांच्या यादीत (सीएसआर) नसायची. पाण्याला त्यांचे प्राधान्य असे. पाणी या विषयावर जनता, राजे, व्यापारी एकत्र येऊन चर्चा करीत व वर्षभराचे नियोजन करीत, पण आता उद्योजक, व्यापारी बदलले. हेच व्यापारी, उद्योजकपाणी जमिनीतून बेसमुमार पणे उपसतात, व तेच पाणी आपल्याला बाटली बंद करून देतात. जे पाणी हडपतात, पाणी दूषित करतात, त्यांना मुभा आहे व जे पाण्यासाठी, जलपुनर्भरणासाठी काम करतात, त्यांना पाणी मिळत नाही, अशी चिंताही राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.