शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:49 PM2024-03-16T12:49:40+5:302024-03-16T12:50:01+5:30

सांगली : शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ ...

21 days deadline to raise objections on Shaktipeeth highway, meet in Sangli next Saturday | शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत, सांगलीत येत्या शनिवारी मेळावा

सांगली : शक्तिपीठ महामार्गावर हरकती घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे ७ मार्चपासून २८ मार्चपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.

८०३ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला सर्व म्हणजे १२ जिल्ह्यांतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. बैठका, मेळावे यातून शेतकरी विरोध दर्शवत आहेत. आता रीतसर हरकतींमुळे या विरोधाला कायदेशीर रूप येऊ पाहत आहे. शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत हरकतींसाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

हे राजपत्र ७ मार्च रोजी जारी करण्यात आले असून २८ मार्चपर्यंत हरकती नोंदवता येतील. महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी सांगितले की, भूसंपादन अधिकारी या नात्याने मिरज आणि आटपाडीच्या प्रांताधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी हरकती दाखल कराव्यात. आम्ही सोमवारी (दि. १८) एकत्रित हरकती दाखल करणार आहोत.

सांगलीत येत्या शनिवारी शेतकरी मेळावा

दरम्यान, सांगलीत येत्या शनिवारी (दि. २३) शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. सांगलीवाडीत जुन्या पथकर नाक्याजवळील फल्ले मंगल कार्यालयाजवळ दुपारी एक वाजता मेळावा होईल. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. अजित नवले मार्गदर्शन करणार आहेत.

शेती उद्ध्वस्त करणारा महामार्ग आम्हाला नको अशी भूमिका या मेळाव्याच्या आयोजनामागे आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून बाधित शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव समितीने आयोजन केले आहे.

Web Title: 21 days deadline to raise objections on Shaktipeeth highway, meet in Sangli next Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.