पर्ससीननेट मच्छीमारी पूर्णत: बंद

By admin | Published: April 3, 2016 09:47 PM2016-04-03T21:47:40+5:302016-04-03T23:30:47+5:30

भादुले : चोरटी मच्छीमारी होत असल्याच्या अनेक तक्रारी; तक्रारीनंतर कसून तपास

Perseinનેટ fishery completely closed | पर्ससीननेट मच्छीमारी पूर्णत: बंद

पर्ससीननेट मच्छीमारी पूर्णत: बंद

Next

अरूण आडिवरेकर ल्ल रत्नागिरी
पर्ससीननेट मच्छीमारीवर बंदी घातल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही मच्छीमारी होत नसल्याची माहिती मस्त्य विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिलीे. जिल्ह्यात पर्ससीननेटद्वारा चोरटी मच्छीमारी होत असल्याच्या आपणाकडे तक्रारी येत आहेत. या तक्रारीनंतर आपण प्रत्यक्ष त्याठिकाणी जावून तपास करत आहोत. मात्र, कोठेही मच्छीमारी होत नसल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
पारपंरिक आणि पर्ससीननेट मच्छीमार यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून वाद सुरू आहे. या वादामुळे संघर्षाचीही ठिणगी पडलेली आहे. त्यातच शासनाने पर्ससीननेटद्वारा होणाऱ्या मच्छीमारीवर बंदी घातल्याने हा वाद आणखीनच चिघळला आहे. शासनाच्या या बंदी आदेशानंतर मच्छीमारी होणाऱ्या भागातून असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे. पर्ससीननेट मच्छीमारांनी याविरोधात आवाज उठविला असून, ही बंदी उठविण्याची मागणी केली आहे. मात्र, शासन अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहे. या बंदी आदेशामुळे जिल्ह्यातील पर्ससीननेट मच्छीमारी करणाऱ्या नौका किनाऱ्यावर उभ्या असल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही बंदी लवकर उठविण्याच्या मागणीला जोर आला आहे.
दरम्यान, या बंदी कालावधीत रत्नागिरीत अनेक ठिकाणी चोरटी मच्छीमारी होत असल्याचे प्रकार चर्चिले जात आहेत. त्यानुसार १९ मार्च रोजी वरवडे परिसरात रात्रीच्या सुमाराला काही बोटी मच्छीमारीसाठी गेल्या होत्या. त्यांनी तार्ली मच्छी पकडल्याची तक्रार मत्स्य विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर ३० मार्च रोजी अशीच चोरटी मच्छीमारी केल्याची तक्रार झाली. या तक्रारी सुरू असताना चिपळूण येथे इस्तिमा सुरू असताना रत्नागिरीतील काही मच्छीमार बांधव मच्छीमारीसाठी गेल्याची तक्रार करण्यात आली. शनिवारी (२ एप्रिल) वरवडे येथे पुन्हा रात्रीच्या सुमाराला बोटी मच्छीमारीसाठी गेल्याची तक्रार करण्यात आली. मिनी पर्ससीननेटद्वारा बंदीच्या काळात चोरटी मच्छीमारी होत असल्याच्या तक्रारींमुळे मच्छीमार बांधवांकडे संशयाने पाहिले जात आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मत्स्य विभागाचे सहाय्यक मत्स्य आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात कोठेही मच्छीमारी होत नसल्याचे सांगितले. रत्नागिरीत चोरटी मच्छीमारी होत असल्याच्या तक्रारी आपणाकडे येत आहेत. मात्र, त्यामध्ये तथ्य नाही. या तक्रारी आल्यानंतर आपण स्वत: घटनास्थळी जावून तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शंभर टक्के मच्छीमारी बंदी आहे. काही दिवसांपूर्वी भाटकरवाडा येथे मच्छीमारी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तेथे १०० प्लेटस् बांगडा मासा मिळाल्याचे सांगितले होते. त्याठिकाणी तीनच बोटी आहेत. त्या बोटींमधील जाळे पूर्णत: कोरडे होते. तसेच बोटींची तपासणी केली असता त्यात काहीही आढळले नाही. त्यांनी मच्छी घरात ठेवली असल्याच्या संशयावरून संपूर्ण घराचीही झाडाझडती घेण्यात आली. मात्र, त्यातही काही सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ रत्नागिरीतच नव्हे तर जिल्ह्यात कोठेही पर्ससीननेटद्वारा मच्छीमारी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरट्या मच्छीमारीच्या येणाऱ्या तक्रारी या फसव्या असून, यामुळे संबंधितांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा करणे आपले काम असल्याने तक्रारीनुसार तपास करण्यात येत आहे. बंदी कालावधीत कोठेही मच्छीमारी होऊ नये यासाठी रात्रंदिवस पहारा ठेवला जात आहे. त्यामुळे कोठेही अशी मच्छीमारी होताना आढळलेली नाही. खोट्या तक्रारींमुळे मच्छीमारांमध्ये वाद होण्याची चिन्हे अधिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरक्षारक्षक : कडक कारवाई करणार
जिल्ह्यात होणाऱ्या चोरट्या मच्छीमारीवर अंकुश ठेवण्यासाठी बंदीनंतर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात ६९ सुरक्षारक्षक नेमण्यात आले. त्यातील ६१ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. हे सुरक्षारक्षक समुद्रात करडी नजर ठेवून असून, समुद्रात जाणाऱ्या बोटींच्या नोंदी ठेवत आहेत.
पर्ससीननेट मच्छीमारीवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या बंदी कालावधीत कोणतीही नौका मच्छीमारी करताना आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर केस दाखल करून जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे भादुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रशिक्षण नाही
समुद्रकिनाऱ्यावर नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. शिवाय त्यांच्याकडे बचावात्मक साहित्य देण्यात आलेले नाही.

Web Title: Perseinનેટ fishery completely closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.