रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

By शोभना कांबळे | Published: December 15, 2023 05:42 PM2023-12-15T17:42:04+5:302023-12-15T17:42:33+5:30

रत्नागिरी : सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच आता सर्वांनाच मोफत उपचार केले जात असल्याने जिल्हा शासकीय ...

Blood shortage in Ratnagiri district hospital | रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

रत्नागिरी : सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच आता सर्वांनाच मोफत उपचार केले जात असल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल होणाऱ्या विविध आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. अपघातांची संख्याही वाढल्याने जिल्हा रूग्णालयात विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सध्या सर्दी, खोकला, तापसरी याचबरोबर डेंग्यूसारखे आजारही वाढले असल्याने गंभीर रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल करावे लागते. प्रसुतींची संख्या वाढली आहे, अपघातांमध्ये गंभीर होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून प्रसूतीसाठी येणाऱ्या माता, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, आर्थिक दुर्बल, हिमोफिलीया, थॅलिसिमिया सारख्या आजारग्रस्त रूग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या रूग्णालयाच्या रक्तपेढीची गरज वाढली आहे.

रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. एखाद्या रक्तगटाचा तुटवडा होताच रक्तपेढीतून रक्तदात्यांशी संपर्क केला जातो. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, सध्या जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीला विविध गटाच्या रक्तांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या दिवसाला २५ ते ३० पिशव्या लागत आहेत. मात्र, सध्या केवळ ४० रक्त पिशव्या शिल्लक आहेत. त्यामुळे रक्तपेढीला प्राधान्य क्रम ठरवून रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागत आहे. विविध रक्तदाते आणि सामाजिक संस्था यांना रक्तदानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Blood shortage in Ratnagiri district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.