ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांची रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरून फेरी कॉँग्रेसच्या काळा दिवस आंदोलनाला प्रत्युत्तर

रत्नागिरी ,दि. ९ : देशभरात कॉँग्रेस पक्षातर्फे नोटाबंदीविरोधात वर्षपूर्ती दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात असतानाच भाजपनेही देशात नोटाबंदी कशी यशस्वी झाली, मोदी सरकार कसे यशस्वी झाले, याची माहिती जनतेला व्हावी, यासाठी रस्त्यारस्त्यावर एकत्र येऊन लोकांना माहिती दिली.

रत्नागिरीतही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातील रस्त्यांवरून फेरी काढली व अनेक ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाद्वारे जनतेला मोदी सरकारच्या कामांची माहिती देताना कॉँग्रेसच्या काळा दिवस आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.


या फेरीमध्ये भाजपचे पदाधिकारी माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर तसेच महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. मारूती मंदिर व शहर बाजारपेठेतील अनेक ठिकाणी या फेरीद्वारे भाजप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या यशस्वी कामांबाबत लोकांना माहिती दिली.


या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रतर्फे प्रसारित भाजप सरकारची कामगिरी असे पत्रकही वितरीत करण्यात आले. देशाने २०१४पर्यंत समर्थ नेता, स्थिर सरकार, धोरणांना आलेला लकवा अनुभवला. मात्र, त्यानंतर देशाला मोदी यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व लाभले आहे.

काळ्या पैशांच्या विरोधात लढा उभारून जुन्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय देशासाठी फायदेशीर ठरला, असे यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी फेरीदरम्यान नागरिकांना सांगितले. नोटाबंदीमुळे देशाला धोका असलेल्या भ्रष्टाचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असा दावाही या फेरीद्वारे करण्यात आला.