शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 12:00 PM2023-12-25T12:00:42+5:302023-12-25T12:01:09+5:30

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेग

Agriculture will be included in education from the beginning, Education Minister Deepak Kesarkar announcement | शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

शिक्षणात पहिलीपासून कृषी विषयाचा समावेश करणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा

दापोली (रत्नागिरी) : कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेऊन व्यवहारिक शेती केली तर शेतीमधून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते. खरंतर विद्यार्थी जसे घडवू तसे घडतात. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येणार असल्याची घाेषणा राज्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दापोलीत केली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प-संस्थात्मक विकास योजना आयोजित ‘आधुनिक कृषी शिक्षणाची संधी : भविष्याची उज्ज्वल नांदी’ या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मंत्री केसरकर बाेलत हाेते.

यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डाॅ. संजय भावे, कार्यकारी परिषद सदस्य संदीप राजपुरे, सुनील दळवी, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुळकर्णी, स्वीय सहायक जितेंद्र काळेपाटील, डॉ. अतुल मोहोड, डॉ. संतोष सावर्डेकर, डॉ. विनायक पाटील, दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे, उपविभागीय कृषी अधिकारी दिशांत कोळप उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, कोकण कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. कोकणातील पाणीटंचाईवर विद्यापीठाने कोकण विजय बंधारा विकसित केला आहे. त्याबरोबरच टायर बंधारे प्रात्यक्षिके आयोजित करावीत. भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत. कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून, चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले.

संपूर्ण भारतातील पहिला प्रयाेग

हा कृषी शिक्षण महोत्सव संपूर्ण भारतातील २२ कृषी विद्यापीठांच्या योजनेंतर्गत प्रथमच दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे, असे काेकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय भावे यांनी सांगितले.

शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणार

राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर कृषीचे प्रशिक्षण घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कृषीचे शिक्षण देणार आहेत. पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

Web Title: Agriculture will be included in education from the beginning, Education Minister Deepak Kesarkar announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.