103-wicket-years, 2017 years: 'Highway' 'Dewey' continues, but the number of Accidents decreases | मुंबई-गोवा महामार्गाने घेतले १०३ बळी, २०१७ वर्ष : ‘हायवे’चा ‘डायवे’ कायम, मात्र अपघातांची संख्या घटली

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग बनला सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

विहार तेंडुलकर 

रत्नागिरी : सतत वर्दळ असलेला परंतु काही ठिकाणी राज्य मार्गाएवढाही रुंद नसलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र काही अद्यापही सुटलेले नाही. मात्र दिलासादायक बाब म्हणजे अपघातांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. सध्या महामार्ग चौपदरीकरणाच्या गप्पा रंगलेल्या असताना मावळलेल्या २०१७मध्येही महामार्गावरील खड्ड्यांनी आणि अरुंदपणाने १०३ प्रवाशांचे बळी घेतले.

मुंबई-गोवा महामार्ग हा अरुंद, वाहनांची वाढती वर्दळ, खड्डे अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. या चर्चेत राहणाºया कारणांमुळेच महामार्गावर अपघात वाढत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हा सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. २०१७या वर्षात पनवेल ते कसाल या ४५० किमीच्या महामार्गावर ८७८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातामध्ये १२८३ प्रवासी जखमी झाले, तर १०३ प्रवाशांचा बळी गेला.

मागील काही वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी कमी असली तरी अपघातांचे प्रमाण अजूनही म्हणावे तेवढे कमी झालेले नाही, हेच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे प्रतिवर्षी या महामार्गावर सरासरी एक हजार व्यक्तींचा अपघाती मृत्यू होतो, ते प्रमाण आता काहीसे कमी आले आहे.

मात्र महामार्गावर मद्यपान करून गाडी चालवणे, कायद्याचे उल्लंघन होईल, अशा पध्दतीने वाहन हाकणे अशा विविध कारणांमुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांची महामार्गावर कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही हे प्रमाण कमी झालेले नाही. गेल्या वर्षभरात १ लाख १ हजार ५०४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यातून २ कोटी ३ लाख ४७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सध्या पर्यटन हंगाम असल्याने त्यातच गेल्या दहा दिवसात जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्ष स्वागत यामुळे महामार्गावर वाहनांची रेलचेल होती. मात्र तरीही वर्षभरात या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात संबंधित यंत्रणेला यश आले आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.


वर्ष          अपघातांची संख्या         मृत

२०१३                 ११८६                २०१
२०१४                 १०८४                २०५
२०१५                 १०८८                १७४
२०१६                १०५७                 १६३
२०१७                  ८७८                १०३
 

सध्या या महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे तर दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणदार रस्ते, वाढती अवजड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालवणे, दुपदरी असलेल्या महामार्गावर रस्ता दुभाजकही नसणे अशा विविध कारणांमुळे हे अपघात होत आहेत.