रस्त्यांच्या कामांमुळे अलिबागमध्ये वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:31 PM2019-06-02T23:31:08+5:302019-06-02T23:31:19+5:30

कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी : शनिवार, रविवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहनांची गर्दी

Traffic workers in Alibaug for road works | रस्त्यांच्या कामांमुळे अलिबागमध्ये वाहतूककोंडी

रस्त्यांच्या कामांमुळे अलिबागमध्ये वाहतूककोंडी

Next

अलिबाग : शहरातील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल ते मारुती मंदिर या ठिकाणी सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अलिबाग हे पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण असल्याने विशेषत: शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीमध्ये कमालीची भर पडत आहे. त्यामध्ये वाहने अडकून पडत असल्याने पर्यटकांसह स्थानिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

उन्हाळ्याची सुट्टी आता संपत आली आहे, असे असले तरी अलिबागला फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने एक दिवसाच्या पिकनीकसाठी पर्यटक अलिबागलाच पसंती देतात. त्याचप्रमाणे पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून तसेच देशी-विदेशी पर्यटकांचा येथे राबता असल्याने अलिबाग हे पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन बनले आहे. शाळांना सुट्टी लागल्यानंतर म्हणजे मार्च महिन्यापासूनच पर्यटकांनी अलिबागला येण्यास सुरुवात केली होती. ती आता जून उजाडला तरी सुरूच असल्याचे पर्यटकांच्या संख्येवरून दिसून येते, त्यामुळे येथील हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग यांचा व्यवसाय तेजीत आहेत. या ठिकाणी ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटनाला वाव आहे. त्याचप्रमाणे येथील सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे कायमच पर्यटकांना साद घालत असल्याने अलिबाग, वरसोली, किहीम, आक्षी, नागाव, काशिद, मुरुड येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसून येते.
मुंबईच्या जवळ असणाºया अलिबागचा म्हणावा तसा विकास झालेला नसला, तरी विकासाकडे आता सकारात्मक नजरेने पाहिले जात आहे.

पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात, यासाठी स्थानिक प्रशासनाने विविध सोयी-सुविधा उभारण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा म्हणजेच सुसज्ज रस्ते निर्माण करणे गरजेचे आहे.

अलिबाग नगरपालिकेने रस्ते निर्मितीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले आहे. रस्ते वर्षानुवर्षे सुस्थितीत राहावेत यासाठी सिमेंट क्राँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल ते मारुती मंदिर या ठिकाणी सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्याचे काम गेले २० दिवस सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडली आहे. या दिवशी पिंपळभाटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सर्वांनाच ताटकळत बसावे लागले.

वाहतूक पोलीस एचपी पेट्रोल पंपाजवळ तैनात होते; परंतु मुंबई-पुण्याहून येणारी वाहने, मुरुडला जाणारी वाहने, तसेच अलिबागमधून बाहेर पडणाºया वाहनांचे नियोजन करताना चांगलीच दमछाक होताना दिसत होती.

सूचना फलकाची गरज
सुरुवातीच्या कालावधीत प्रशासनाने नो एन्ट्रीच्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले होते. मात्र, आता नसल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी बीएसएनएल बायपासमार्गे मुंबई-पुण्याकडील वाहतूक वळवण्यात आली आहे, तर अलिबागमध्ये येणाºया वाहनांसाठी श्रीबागमधील अंर्तगत रस्त्याचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण बाहेरून येणाऱ्यांना अंर्तगत रस्त्याबाबत माहिती होत नाही. त्यासाठी सूचना फलक लावल्यास सर्व वाहने अंर्तगत रस्त्याने अलिबाग बिचकडे जाऊ शकतात.

क्रीडाभुवन पार्किंगने झाले हाउसफुल्ल
मोठ्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाल्याने अलिबाग शहरातील क्रीडाभुवन मैदानावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते, त्यामुळे स्थानिकांना मैदानावर खेळता आले नाही. शनिवारपासून अशीच परिस्थिती असल्याने खेळाडूंचा हिरमोड झाला. वाहनांच्या पार्किंगसाठी नगरपालिकेने स्वतंत्र व्यवस्था करावी, कारण अलिबागमध्ये येणाºया वाहनांकडून नगरपालिका वेगळा कर घेते. त्यामुळे ही त्यांची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Traffic workers in Alibaug for road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग