Pune: सुसगाव येथील कामगारांच्या झोपड्यांना आग; २० झोपडपट्ट्या जळून खाक, सिलिंडरांचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 12:41 PM2024-03-16T12:41:56+5:302024-03-16T12:42:51+5:30

जवानांनी पाण्याचा मारा करून एका तासात आगीवर नियंत्रण मिळविले...

Workers' huts on fire in Susgaon; 20 slums burnt, cylinders explode | Pune: सुसगाव येथील कामगारांच्या झोपड्यांना आग; २० झोपडपट्ट्या जळून खाक, सिलिंडरांचा स्फोट

Pune: सुसगाव येथील कामगारांच्या झोपड्यांना आग; २० झोपडपट्ट्या जळून खाक, सिलिंडरांचा स्फोट

पुणे : सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून एका तासात आगीवर नियंत्रण मिळविले.

अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे बेलाकासा इमारती शेजारी असणाऱ्या कामगारांसाठी पत्राच्या शेडच्या ५० झोपड्या आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास येथे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने गांभीर्य लक्षात घेऊन औंध, पाषाण, कोथरूड, वारजे येथील बंब तसेच एक वाॅटर टँकर आणि पीएमआरडीए दोन बंब व वॉटर टँकर व हिंजवडी एमआयडीसी येथील १ बंब अशी ९ वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती.

पत्र्याचे शेड असलेल्या झोपड्यांना मोठी आग लागली होती. आतमध्ये कोणी अडकले आहे का? हे पाहत अग्निशामक दलाच्या वतीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. आग इतर झोपड्यांमध्ये पसरू नये याची खबरदारी घेऊन सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणून पुढील धोका दूर केला. या आगीत झोपडपट्टीतील घरगुती वापराच्या तीन सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकली. या झोपडपट्टीतील घरगुती वापराचे छोटे-मोठे २८ सिलिंडर जळाले आहेत. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नाही. घटनास्थळी कामगारांच्या ५० झोपड्या आहेत. शुक्रवारी लागलेल्या आगीत २० झोपड्या पूर्ण जळाल्या, तर इतर ३० झोपड्यांची अग्निशामक दलाच्या जवानांनी हानी होऊ दिली नाही. कामगारांच्या झोपड्यातील घरगुती साहित्य व गृहोपयोगी वस्तू पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या कामगिरीत अग्निशमन दलप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे व सुमारे तीस-चाळीस जवानांनी पाण्याच्या मारा केला.

आमच्या जवानांनी वेळेत पोहोचत आग इतरत्र पसरू न देता मोठा धोका टाळला. सिलिंडर मोठ्या प्रमाणात असल्याने जर त्यांचा स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. जवानांच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली.

- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका

Web Title: Workers' huts on fire in Susgaon; 20 slums burnt, cylinders explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.