संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखाचा निधी रद्द! योग्य विनियोग होत नसल्याने मसापचा निर्णय

By श्रीकिशन काळे | Published: January 29, 2024 02:54 PM2024-01-29T14:54:58+5:302024-01-29T14:55:15+5:30

प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता...

The fund of 1 lakh to the president of the conference is cancelled! Decision of Masap due to lack of proper allocation | संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखाचा निधी रद्द! योग्य विनियोग होत नसल्याने मसापचा निर्णय

संमेलनाध्यक्षांना मिळणारा १ लाखाचा निधी रद्द! योग्य विनियोग होत नसल्याने मसापचा निर्णय

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्रभर वाड्:मयीन दौऱ्यासाठी फिरता यावे, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने एक लाख रूपयांचा निधी दिला जायचा. पण, तो निधी आता मिळणार नाही. कारण ‘मसाप’ने निधीचा योग्य विनियोग होत नसल्याने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फौंडेशनतर्फे दरवर्षी संमेलनाध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी दिला जायचा, तो रद्द केल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि पुण्यभूषण फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली. २०१० साली पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फौंडेशनने ८३ लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम राबविण्याबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी ग्रामीण व दुर्गम भागातील विविध वाङ्:मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाङ्मयीन चळवळींना बळ देण्यासाठी तसेच तिथल्या साहित्यसंस्था व ग्रंथालये यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहताना मानधन, प्रवास - निवासाच्या खर्चाचा भार तिथल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या संस्थांवर व संयोजकांवर पडू नये, हा निधी देण्यामागचा हेतू होता. तो साध्य होत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रा. जोशी यांनी सांगितले.

या निधीचा हिशेब देणे संमेलनाध्यक्षांकडून अपेक्षित नाही, मात्र झालेल्या उपक्रमांविषयीची माहितीही दिली जात नाही, अशी खंत प्रा. जोशी यांनी व्यक्त केली. डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अरुणा ढेरे यांचा सन्माननीय अपवाद वगळता या संदर्भात संमेलनाध्यक्षांची उदासीनताच दिसून आली. ज्या हेतूसाठी हा निधी दिला जात होता तो साध्य होत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे प्रा. जोशी आणि डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले. हा निधी कोणत्या वाङ्मयीन उपक्रमांसाठी खर्च करायचा याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत नारळीकरांनी केला निधी परत
कोरोनाच्या संकट काळात कार्यक्रमांवर असलेल्या बंधनांमुळे तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे, असे सांगून डॉ. जयंत नारळीकरांनी एक लक्ष रुपयांचा निधी परत केला होता.

Web Title: The fund of 1 lakh to the president of the conference is cancelled! Decision of Masap due to lack of proper allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.