शरद मोहोळ खून प्रकरण: ॲड रवींद्र पवार याच्यावर पूर्वीही एक गुन्हा दाखल

By नम्रता फडणीस | Published: January 9, 2024 09:21 PM2024-01-09T21:21:26+5:302024-01-09T21:21:58+5:30

मारहाण केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...

Sharad Mohol murder case: A case has already been registered against Adv Ravindra Pawar | शरद मोहोळ खून प्रकरण: ॲड रवींद्र पवार याच्यावर पूर्वीही एक गुन्हा दाखल

शरद मोहोळ खून प्रकरण: ॲड रवींद्र पवार याच्यावर पूर्वीही एक गुन्हा दाखल

पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणात ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, यातील ॲड. रवींद्र पवार याच्यावर एका सरकारी वकिलाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल आहे.

गेल्या वर्षी वडगाव मावळ न्यायालयात ही घटना घडली होती. खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदार तपासणी प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षात सरकारी वकील प्रेमकुमार सुंदरलाल अगरवाल यांना ॲड. रवींद्र पवार याच्यासह तीन वकिलांनी मारहाण केली होती. याप्रकरणी ॲड. अगरवाल यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दिली.

कामशेत पोलीस स्टेशनमध्ये एका दाखल गुन्ह्यातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायालय वडगाव मावळ येथे न्यायदान कक्षामध्ये फिर्यादी सरकारी वकील हे गुन्ह्यातील मुद्देमालाशिवाय साक्षीदार तपासणीस तयार नसल्याने आरोपीच्या वकिलांनी मनात राग धरून सरकारी वकिलाला न्यायदान कक्षातच अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. न्यायदान कक्षात एका सरकारी वकिलाला वकिलांनीच मारहाण करण्याचा प्रकार पहिल्यांदा घडला होता.

सरकारी वकिलांनी दिलेल्या फिर्यादींनुसार तिन्ही वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींमध्ये ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांचाही समावेश आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात इतर आरोपींबरोबरच या दोन वकिलांवर शस्त्र व अधिनियम १९५९ कलम २५, ३ तसेच भा.दं. वि कलम ३०२, ३०७, ३४ तसेच महराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) , ३७ (३) आणि १३५ अंतर्गत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मला रवींद्र पवार याने कोर्टातच मारायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र याप्रकरणात त्याने अटकपूर्व जामीन घेतला आहे. पोलिसांनी नंतर काय तपास केला माहिती नाही. मी केस मागे घेतलेली नाही आणि घेणारही नाही. पवार हे अत्यंत उद्धट असून, कोर्ट व वकील सर्वांशी हुज्जत घालतात. मी म्हणेल तेच खरे असे त्याचे व्यक्तिमत्व आहे

- ॲड. प्रेमकुमार अगरवाल, सरकारी वकील

Web Title: Sharad Mohol murder case: A case has already been registered against Adv Ravindra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.