'हमारा बजाज'च्या शिल्पकाराला अखेरचा निरोप; राहुल बजाज यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 05:48 PM2022-02-13T17:48:34+5:302022-02-13T18:24:30+5:30

पुण्यात वैकुंठस्मशान भूमी येथे त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

rahul bajaj passed away in pune | 'हमारा बजाज'च्या शिल्पकाराला अखेरचा निरोप; राहुल बजाज यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

'हमारा बजाज'च्या शिल्पकाराला अखेरचा निरोप; राहुल बजाज यांच्यावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

पुणे : जगातील प्रसिद्ध उद्योजक, बजाज समूहाचे आधारस्तंभ राहुल बजाज यांचं काल पुण्यात निधन झालं. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. काल दुपारी अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर रुबी हॉल इथंच त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं.  पुण्यात वैकुंठस्मशान भूमी येथे त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पुणे मुबंई महामार्गावरील आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात आज सकाळी १० ला राहुल बजाज यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यावेळी उद्योग, कामगार, राजकीय आणि सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बजाज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर साडेअकरा वाजता सांस्कृतिक भवन प्रागण येथे पार्थिव नेण्यात आले. तिथे पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. पोलीस पथकाच्या वतीने दुपारी बारा वाजता मानवंदना देणात आली. त्यानंतर दर्शन सुरू करण्यात आले. भर उन्हातही मोठ्या प्रमाणावर कामगार आले होते. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्यांचे पार्थिव पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. 

गेल्या पाच दशकांपासून बजाज समूहाला यशाच्या सर्वोच्च शिखरात पोहोचवण्यात त्यांचा खूप मोठा आणि मौल्यवान वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगसमूहात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते तरुण उद्योजकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या निधनामुळे बजाज समूहाचं वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं आहे. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. राहुल बजाज यांना 2001 मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

राहुल बजाज यांचा जीवनप्रवास 

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 चा आहे. राहुल बजाज हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते जमनालाल बजाज यांचे नातू होते. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमध्ये इकॉनॉमिक ऑनर्स केल्यानंतर राहुल बजाज यांनी 3 वर्षं बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षणही घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी 60 च्या दशकात हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1968 मध्ये ते 30 व्या वर्षी बजाज ऑटो लिमिटेडमध्ये सीईओ झाले. या पदावर पोहोचणारे ते सर्वात तरुण भारतीय होते. त्यांच्याकडे जेव्हा कंपनीची धुरा आली तेव्हा देशात लायसन्स राज होतं. सरकारच्या इच्छेशिवाय उद्योगपती काहीच करू शकत नव्हते. उद्योगपती, बिझनेसमन यांच्यासाठी ही कठीण परिस्थिती होती. उत्पादनालाही मर्यादा होत्या. या स्थितीत राहुल बजाज यांनी बजाज कंपनीला देशातली अग्रेसर कंपनी म्हणून नावारूपाला आणलं. ते कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या भूमिकेत काम करत होते. राहुल बजाज यांनी गेल्यावर्षी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी 67 वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.

यावेळी योगगुरू बाबा रामदेव, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अंकुश काकडे, राजीव बजाज, संजीव बजाज, सुनयना केजरीवाल, नीरज बजाज, मधुर बजाज आणि त्यांचा परिवार  खासदार सुप्रिया सुळे, अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अंकुश काकडे, विलास लांडे, मोहन जोशी, अभय छाजेड, बाबा रामदेव, बाबा कल्याणी, कृष्णकुमार गोयल यांनी श्रद्धांजली वाहिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

Web Title: rahul bajaj passed away in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.