वर्ल्डकप पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; शहरात हॉटेल, मैदान, लाॅजवर लागले स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:38 PM2023-11-19T12:38:19+5:302023-11-19T12:38:33+5:30

अंगात निळी भारताच्या नावाची जर्सी घालून सामना पाहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो

Punekar ready to watch World Cup In the city screens were installed on hotels grounds lodges | वर्ल्डकप पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; शहरात हॉटेल, मैदान, लाॅजवर लागले स्क्रीन

वर्ल्डकप पाहण्यासाठी पुणेकर सज्ज; शहरात हॉटेल, मैदान, लाॅजवर लागले स्क्रीन

पुणे : क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी पुणेकरांनी जय्यत तयारी केली असून, ठिकठिकाणी हाॅटेल, रेस्टॉरंटसह मोठ्या मैदानावर आणि टेरेसवर स्क्रीन लावण्यात आले आहेत. हा सामना सर्वांसोबत पाहत जल्लोष केला जाणार आहे. त्यासाठी खास तिरंगा, टी-शर्टची खरेदी देखील अनेकांनी केली आहे. भारत जिंकल्यानंतर वेगळाच जल्लोष करण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत.

अंतिम सामना पाहण्यासाठी शहरातील सर्व ठिकाणी शनिवारी (दि. १८) दिवसभर तयारी केली जात होती. हाॅटेलमध्ये मोठ्या पडद्याची व इतर गोष्टींची तजवीज करण्यात येत होती. तसेच विमाननगर, कोरेगाव पार्क येथील मोठ्या लाॅजवर विशेष सोय केली आहे. तिथे शंभर रुपये आणि त्याहून अधिक रुपयांची तिकिटे लावण्यात आली आहेत. तसेच ऑफलाइन बुकिंग देखील घेण्यात आली आहे.

हा सामना एकट्याने पाहणार की कुटुंबातील सदस्यांसोबत? याची माहिती घेतली जात होती. तशी सोय लाॅजवर करून देण्यात येत होती. सोबतीला खाद्यपदार्थ आणि कोल्ड्रिंक्सची सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच सर्वत्र शहरभर अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे.

एकमेकांसोबत आनंदोत्सव 

काही गणेश मंडळांनीही भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल मॅच एलईडीवर पाहण्याची खास सोय केली आहे. हा सामना एकत्र पाहण्यावर सर्वांचा भर आहे. मस्त शिट्टी, जोरजोरात एकमेकांना टाळ्या देऊन सामन्याचा आनंद घेण्यासाठी सर्व सज्ज झाले आहेत.

तुळशीबागेत थेट प्रक्षेपण 

तुळशीबाग मंडळाच्या वतीने स्क्रीनच्या माध्यमातून अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तुळशीबागेत नेहमीच खरेदीसाठी गर्दी होत असते. त्या नागरिकांना सामना पाहता यावा, खरेदी करता करता सामना पाहण्याचा आनंद मिळावा, म्हणून ही व्यवस्था केली आहे. भारत अंतिम फेरीत खेळत असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना प्रत्येक दहा षटकानंतर एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. भाग्यवान विजेत्यांना सवाई मसाला यांच्या वतीने गिफ्ट देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे अनेक गिफ्ट उद्या ठिकठिकाणी मिळणार आहेत.

निळ्या जर्सीसोबत पाहणार सामना 

अंगात निळी भारताच्या नावाची जर्सी घालून सामना पाहण्याचा आनंद अविस्मरणीय असतो. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींनी ही जर्सी विकत घेतली आहे. ही घालूनच अनेक कार्यालयांमध्ये, हॉटेलमध्ये, सोसायट्यांमध्ये सामना पाहिला जाणार आहे. तशी तयारी केली आहे.

आमच्याकडे तिरंगा घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून चांगली गर्दी होती. वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहताना अनेकांना हातात तिरंगा हवा असतो. जल्लोष करताना तिरंगा फडकवला जातो. घरात, मैदानात, हॉटेलमध्ये किंवा सोसायटीमध्ये एकत्र सामना पाहताना तिरंगा सोबत असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. - गिरीश मुरूडकर, झेंडेवाले

Web Title: Punekar ready to watch World Cup In the city screens were installed on hotels grounds lodges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.