'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

By विवेक भुसे | Published: January 23, 2024 12:04 PM2024-01-23T12:04:23+5:302024-01-23T12:05:41+5:30

वकिलाने पोलीस तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील असे तक्रारदाराला सांगितले

Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy | 'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

'तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच घेतील..." खूनाच्या कट सहभागापाठोपाठ लाचेमध्येही वकिलाची मध्यस्थी

पुणे : शरद मोहोळ याच्या खूनाच्या आरोपींबरोबर दोन वकिलाना अटक केली गेली. पाठोपाठ आता चक्क पोलिस उपनिरीक्षकांच्या वतीने लाच स्वीकारण्यासाठी वकिल मध्यस्थ करीत असल्याचे आढळून आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वकिलासह पोलिस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश वसंत चव्हाण (वय ३५, रा. परमारनगर शासकीय पोलीस क्वॉटर, वानवडी) आणि अ‍ॅड. राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१, रा. चित्रदुर्ग अपार्टमेंट, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत एका ३४ वर्षाच्या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार याच्या भावाविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण याच्याकडे त्याचा तपास आहे. तक्रारदार याच्या भावाला अटक न करणे व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी चव्हाण याने तक्रारदार याला ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार आल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यात चव्हाण यांनी राहुल फुलसुंदर याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राहुल फुलसुंदर याच्याशी संपर्क केल्यावर त्याने तक्रारदार याला ते तुमच्याकडून पैसे घेणार नाही, माझ्याकडूनच घेतील, असे सांगितले. त्यानंतर राहुल फुलसुंदर याने तडजोडी अंती ४० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार पोलिसांनी डहाणुकर कॉलनी पोलीस चौकीजवळ सोमवारी सायंकाळी सापळा रचला. पोलीस चौकीजवळील मिर्च मसाला हॉटेल बाहेर सायंकाळी तक्रारदार याच्याकडून ४० हजार रुपये स्वीकारताना फुलसुंदर याला रंगेहाथ पकडण्यात आले. पाठोपाठ गणेश चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ़ शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस शिपाई तावरे, डावखर, कदम यांनी ही कारवाई केली.

Web Title: Not from you will take money from me Lawyer intercedes in bribery after involvement in murder conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.