नीरा देवघर, भाटघर धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:45 AM2018-12-19T00:45:18+5:302018-12-19T00:45:44+5:30

पाणी योजना संकटात : मे महिन्यात दुष्काळाची तीव्रता वाढणार, पाण्याचे नियोजन करण्याची मागणी

Neera Devgarh, Bhatghar dams reached by the base | नीरा देवघर, भाटघर धरणांनी गाठला तळ

नीरा देवघर, भाटघर धरणांनी गाठला तळ

Next

भोर : यंदा नीरा देवघर व भाटघर धरणे १०० टक्के भरली होती. मात्र दोन महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी झाला आहे. उन्हाळ््याला अद्याप ४ महिने शिल्लक आहे तोपर्यंत पाण्याचा विसर्ग असाच कायम राहिल्यास दोन्ही धरणातील पाणीसाठा कमी होऊन धरण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

आॅक्टोबर महिन्यात पाऊस थांबला. लगेच नोव्हेंबर महिन्यापासून भाटघर धरणातून गेल्या दोन महिने १८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ७३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. नीरादेवघर धरणातून ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. मागील वर्षी यावेळी नीरादेवघर धरणात ९५ टक्के पाणीसाठा होता. सध्या धरणात ७० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा आहे. कालवे नसल्याने दोन्ही धरणातील पाणी नदीतून खाली जात आहे.
भोरच्या पाण्यावर खालील भागातील बागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातो. मात्र दरवर्षी भाटघर धरणातील २४ टीएमसी, नीरादेवघर धरणातील १२ टीएमसी व चापटे गुंजवणी धरणातील ४ टीएमसी असे एकूण ३८ टीएमसी पाणी दर पावसाळ््यात साठवले जाते. उन्हाळा आला, की धरणे रिकामी होतात. स्थानिकांना मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
भाटघर धरण ब्रिटिशकाळात बांधले गेले. त्यामुळे धरणाला तालुक्यासाठी कालवे नसतील. मात्र नीरादेवघर धरण होऊन १५ वर्षे झाली, मात्र अद्यापही धरणाचा उजवा कालवा अपूर्ण तर डावा कालवा कागदावरच आहे. त्यामुळे नीरा नदीतून सोयीस्करपणे पाणी खाली जात आहे. स्थानिकांना पाण्याकडे बघण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे उद्योगव्यवसाय नसलेल्या तरुणांचे बागायती शेती करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते की काय, अशीच अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून पुण्या-मुंबईला जाऊन हॉटेलात, हमाली, दुकानात मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवतात.

धरण उशाला, कोरड घशाला...
भोर तालुक्यातील दोन्ही धरणे १०० टक्के भरतात आणि उन्हाळ््यात पुन्हा रिकामी होतात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे येथील लोकांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली असून दोन्ही धरणाच्या पाण्यावर तयार होणारी वीजही स्थानिकांना मिळत नाही.

भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे नागरी सुविधांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, म्हणून शासनदरबारी हेलपाटे मारीत आहेत.

अनेक धरणग्रस्त मातीआड गेले. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यासाठी आमदार संग्राम थोपटे व धरणग्रस्त संघटना प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Neera Devgarh, Bhatghar dams reached by the base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.