मंथनमधून घडले कथक नृत्याच्या सामर्थ्याचे दर्शन; 'उद्गार'च्या दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:14 PM2018-02-05T12:14:25+5:302018-02-05T12:19:01+5:30

उद्गारतर्फे झालेल्या मंथन मैफलीतून कथक कलेच्या सामर्थ्याचे साक्षात दर्शनच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी घडविले. 

Manthan happened to see the power of Kathak dance; Program for Udgar's completed 20 years | मंथनमधून घडले कथक नृत्याच्या सामर्थ्याचे दर्शन; 'उद्गार'च्या दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

मंथनमधून घडले कथक नृत्याच्या सामर्थ्याचे दर्शन; 'उद्गार'च्या दशकपूर्तीनिमित्त कार्यक्रम

Next
ठळक मुद्देआसावरी पाटणकर आणि मुग्धा पाटणकर यांच्या सादरीकरणाने मैफलीची सुरुवातव्यक्त करण्यास अतिशय अवघड असणाऱ्या या रचनेस केदार पंडित यांनी केले संगीतबद्ध

पुणे : हळुवार अभिनयातून रसिकांना भुरळ पाडणारी  ‘राधा’ तर कधी सारंगीच्या तालावर ठेका धरणारी नर्तिका, आपल्या कर्माची जाणीव करून देतानाच मानसिक रुग्णांच्या भावना नृत्य अभिनयातून उलगडून अंतर्मुख करायला लावणारी नृत्यात्मिका अशा विविध रचना एकाच रंगमंचावरून अनुभवताना रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले. निमित्त होते उद्गारतर्फे झालेल्या मंथन मैफलीचे. या मैफलीतून कथक कलेच्या सामर्थ्याचे साक्षात दर्शनच कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी घडविले. 
तीन वेगळे ताल त्यांचे वेगळे स्वभाव तरी त्यांना एकत्रित बांधण्याची ‘त्रिविधा’ ही संकल्पना आणि यास नृत्याविष्कारातून प्रत्यक्षात साकारणाऱ्या कथक नृत्यांगना आसावरी पाटणकर आणि मुग्धा पाटणकर यांच्या सादरीकरणाने मैफलीची सुरुवात झाली. यानंतर ‘चैतन्य’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची नृत्यरचना स्वरमंचावर सादर झाली. ‘स्क्रिझोफ्रेनिया’ या रुग्णांना समाजातील घटकांतून मिळणारा दुजाभाव तर याच समाजातून मिळणारा आधार आणि आपलेपणा अशी संमिश्र मानसिकता आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी नृत्य, भाव आणि अभिनयाच्या रूपातून अचूकपणे मांडली. 
व्यक्त करण्यास अतिशय अवघड असणाऱ्या या रचनेस केदार पंडित यांनी संगीतबद्ध केले. 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नृत्याविष्काराच्या रूपाने अवतरलेली ‘राधा’ रसिकांना विशेष भावली. राधेच्या तीन अवस्था मुग्धा, मध्यम व प्रौढावस्था व श्रीकृष्णाच्या 
अवतार कार्यामधील तिचे स्थान उलगडण्याचा प्रयत्न आसावरी पाटणकर व त्यांच्या शिष्यांनी या नृत्यात्मिकेतून केला. 
प्रसिद्ध सारंगीवादक संदीप मिश्रा यांचे सारंगी वादन,‘सारंगी’ ही नृत्यरचना दृकश्राव्य माध्यमातून अनुभवताना रसिक अधिकच सुश्राव्य भासले. त्यानंतर सादर झालेली ‘कर्म’ ही रचना पाहताना प्रेक्षक सुन्न झाले. मानवी मनाच्या सुष्ट व दुष्ट अवस्था व कर्मयोगाचे महत्त्व या गोष्टी ‘कर्म’ रचनेच्याद्वारे उद्गारच्या नृत्यांगनांनी अभिनय व नृत्यविष्कारातून उलगडल्या. यासाठी संहितालेखन शैलेश कुलकर्णी व संगीत दिग्दर्शन केदार पंडित यांनी केले, तर कथक नृत्यांगना मनीषा अभय व आभा वांबुरकर यांचाही विशेष सहभाग होता. 
ध्वनिमुद्रित स्वरूपात या पाच रचनांचे सादरीकरण झाले. नृत्यरुपी ‘मंथना’तून अनेक रत्नांचे दर्शन या अनोख्या मैफलीतून रसिकांना घडले. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मंथन’ मैफलीने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली. 

Web Title: Manthan happened to see the power of Kathak dance; Program for Udgar's completed 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे