विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? पुणे मेट्रोचे स्टेरिंग रणरागिणींच्या हाती; १३ महिला कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:12 PM2023-08-04T17:12:57+5:302023-08-04T17:13:08+5:30

पुणे मेट्रोला ७ महिला चालक असून ६ महिलांकडे स्थानकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी

If you can run a plane why not a metro Steering of Pune Metro in hands of Ranragini; 13 women working | विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? पुणे मेट्रोचे स्टेरिंग रणरागिणींच्या हाती; १३ महिला कार्यरत

विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? पुणे मेट्रोचे स्टेरिंग रणरागिणींच्या हाती; १३ महिला कार्यरत

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर पुणेमेट्रोची जबाबदारी महिलांचा मोठा चमू सांभाळत आहे. ७ महिलामेट्रो चालवत असून, ६ महिलांकडे मेट्रो स्थानकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. सर्व मेट्रो स्थानकांचे व्यवस्थापनही एक महिलाच सांभाळत आहे हे विशेष.

सन २०२२च्या दि. ६ मार्चला मोदी यांच्याच हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे व पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचे लोकार्पण झाले. त्यानंतर बरोबर सव्वा वर्षाने दि. १ ऑगस्टला गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मार्गाचेही मोदी यांच्याच हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी एकाच महिला चालकाकडे मेट्रो चालविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता मात्र तब्बल १३  महिला कार्यरत आहेत.

मेट्रोच्या सर्व स्थानकांचे व्यवस्थापन सहायक व्यवस्थापक असलेल्या सुमेधा मेश्राम या पाहतात. त्यांनी सांगितले की सर्व महिला प्रशिक्षित चालक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले त्या दिवसापासून त्याच मेट्रो चालवत आहेत. त्याशिवाय दोन स्थानकांचे व्यवस्थापनही दोन महिलाच करत आहेत. स्थानकाचे व्यवस्थापन म्हणजे तिथल्या मेट्रो येण्याच्या वेळांसह स्थानकांवरील अन्य सर्व ऑपरेशन्स वेळेवर, व्यवस्थित, विनाअडथळा होतील याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

मेट्रो चालविणाऱ्या महिलांपैकी एक साताऱ्याच्या आहेत. अपूर्वा अलटकर त्यांचे नाव. अपूर्वाचे वडील खासगी कंपनीत नोकरीला आहेत. आई गृहिणी आहे. अपूर्वाला दोन भावंडे आहेत. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. यानंतर साताऱ्यातील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये तिने बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातील एका खासगी कंपनीत त्या नोकरी करत होत्या, मात्र कोरोनात ही नोकरी गेली. त्याचवेळी पुणे मेट्रोत टीसी, लोको पायलट, कंट्रोलर या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. अपूर्वाने यांनी अर्ज केला, परीक्षा दिली. उत्तीर्ण झाल्या. दि. २४ फेब्रुवारीला त्यांची पुणे मेट्रोतील पहिली महिला लोको पायलट म्हणून निवड करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि. १) रुबी हॉल क्लिनिक ते वनाज स्टेशन मेट्रोचे सारथ्य केले. आता त्या नियमित चालक म्हणून कार्यरत आहेत.

अन्य महिला चालकांचाही मेट्रोचे सारथ्य करण्याचा अनुभव असाच आहे. महामेट्रोने त्यांना प्रशिक्षित केले आहे. त्या आता कार्यरत झाल्या आहेत. ज्याप्रमाणे ड्यूटी मिळेल त्याप्रमाणे त्या मेट्रोचे सारथ्य करतात. त्यांना नियमित काम दिले जाते. स्थानक व्यवस्थापन सांभाळणाऱ्या सुमेधा यांनी सांगितले की सर्व महिला चालक तसेच स्थानक व्यवस्थापकांचा अनुभव अतिशय चांगला आहे. त्या सर्वजणी जबाबदारीने काम करताना दिसतात.

कामाचा अनुभव रोमांचकारी

लोको पायलट म्हणून काम करणं ही माझ्यासाठी खरोखरंच आनंददायी बाब आहे. आज महिला विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? या कामाचा अनुभव रोमांचकारी आहे. तरुणींनीदेखील करिअरच्या वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. त्यांना यश नक्कीच मिळेल, असे मला वाटते. - अपूर्वा अलटकर, लोको पायलट

मेट्रो चालविणाऱ्या व स्थानक व्यवस्थापन करणाऱ्या महिलांची नावे

मेट्रो चालक महिला

अपूर्वा अलटकर 
गीतांजली थोरात
पल्लवी शेळके
शर्मिन शेख
सविता सुर्वे
प्रतीक्षा माटे
पूजा काळे

स्थानक व्यवस्थापक

दिव्या रामचौरे
शीला जोगदंड
माधवी फुलसौंदर
मृणाल काळमेघ
प्रतीक्षा कांबळे
समीक्षा धरमथोक

Web Title: If you can run a plane why not a metro Steering of Pune Metro in hands of Ranragini; 13 women working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.