गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: विठ्ठल शेलार व रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

By नम्रता फडणीस | Published: January 24, 2024 05:46 PM2024-01-24T17:46:05+5:302024-01-24T17:47:14+5:30

दरम्यान, या प्रकरणात पाहिजे आरोपी असलेला गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे....

Goon Sharad Mohol murder case: Court rejects demand for police custody of Vitthal Shelar and Ramdas Marne | गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: विठ्ठल शेलार व रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: विठ्ठल शेलार व रामदास मारणेच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यासाठी आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची तपास अधिकारी यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे शेलार आणि मारणेला दि. १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पाहिजे आरोपी असलेला गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय-३६), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळाशी) यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २४) संपल्याने दोघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शरद मोहोळ खून प्रकरणातील विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हे दोन मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी मिटिंग घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

तपास अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले की आरोपींची नऊ दिवस पोलीस कोठडी झाली आहे. मात्र, अद्यापही पोलीस मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेत आहेत. त्यासाठी तपास पथके पाठविण्यात आली होती. एका ठिकाणाहून गाडी जप्त करण्यात आली आहे. त्यासाठी शेलार व मारणे या दोघांची मदत झाली. मुख्य सूत्रधार मिळाल्यावर ब-याचशा गोष्टी समोर येऊ शकतील. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी या दोन्ही आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आरोपीच्या वतीने डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली.

भोईटे म्हणाले, पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत. प्रत्येक रिमांड रिपोर्टमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाते. तपासात कोणतीही प्रगती दिसत नाही. त्याला सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी आक्षेप घेत आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी कुठे भेटले याचे स्थळ, सराव कुठे केला याची जागा पोलिसांनी शोधली असून, गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे तपासात प्रगती आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. नऊ दिवसांमध्ये पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊ शकले नसल्याने न्यायालयाने शेलार व मारणे या दोघांना दि. १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Goon Sharad Mohol murder case: Court rejects demand for police custody of Vitthal Shelar and Ramdas Marne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.