"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:56 PM2024-02-19T12:56:31+5:302024-02-19T12:57:37+5:30

किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते....

"Gadkot, let's work to preserve the fort..." Shivjanmatsav celebration organized at Shivneri fort | "गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

"गडकोट, किल्ले जपण्याचे काम करू..." किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की कर. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते.
 
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दुःखापुढे, कल्याणापुढे स्वतःचे दुःख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण  निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आग्र्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा
निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.  

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन
मराठा समाजाला इतर कुणाचेही नुकसान न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.  ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत. जाणता राजाचे महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार तथा म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

Web Title: "Gadkot, let's work to preserve the fort..." Shivjanmatsav celebration organized at Shivneri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.