पर्यावरणप्रेमींची मेट्रो मार्गाला हरकत

By admin | Published: May 27, 2016 04:52 AM2016-05-27T04:52:26+5:302016-05-27T04:52:26+5:30

नदीपात्रातील रस्त्याला घेतली त्याचप्रमाणे मेट्रो रेल्वेच्या नदीपात्रातून जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गाला पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणात

Environmental Metro Rail route | पर्यावरणप्रेमींची मेट्रो मार्गाला हरकत

पर्यावरणप्रेमींची मेट्रो मार्गाला हरकत

Next

पुणे : नदीपात्रातील रस्त्याला घेतली त्याचप्रमाणे मेट्रो रेल्वेच्या नदीपात्रातून जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गाला पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, प्राधिकरणाने सर्व संबंधितांना ७ जुलैपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
खासदार अनू आगा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर व सारंग यादवाडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. असिम सरोदे त्यांच्या वतीने काम पाहत आहेत. प्राधिकरणाने याचिका दाखल करून घेतली असून महापालिका, नगर रचना, केंद्र सरकार, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य जैवविविधता मंडळ यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.
यादवाडकर यांनी सांगितले, की आधीच नदीपात्रातील अतिक्रमणे वाढत आहेत. त्यात मेट्रो मार्गाचे बांधकाम आले, तर पात्र अरुंद होऊन नदीकाठावरील रहिवाशांना धोका निर्माण होईल. मेट्रो मार्गाची आखणी करताना त्याची काळजी घेणे आवश्यक होते; मात्र तशी घेतलेली दिसत नाही. जगातील कोणत्याही देशात नदीपात्रातून मेट्रो मार्ग नेण्यात आलेला नाही, असे पाडगावकर यांनी सांगितले. मार्गबदलाची चर्चा सुरू असतानाच आम्ही सर्व संबंधितांना हरित प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घ्या, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याची दखलच घेतली नाही व थेट नदीपात्रातून मार्ग नेण्यात आला. यात राजकीय हस्तक्षेपही झाला असून काही जणांनी स्वत:च्या मतदारसंघातून मार्ग जावा, यासाठी मार्गात बदल केला असल्याचा आरोपही कोणाचे नाव न घेता याचिकाकर्त्यांनी केला.
यापूर्वी महापालिकेने सिंहगड रस्त्याला पर्याय म्हणून नदीपात्रातून काढलेल्या रस्त्यालाही काही जणांनी हरकत घेतली होती. पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतल्यामुळे मेट्रोपुढेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नदीपात्रात बांधकाम होणार नाही, तर फक्त खांब टाकले जाणार आहेत. मार्गही नदीच्या ३० फुटांपेक्षा जास्त उंचीवर असेल. त्यामुळे नदीच्या पात्रात किंवा वहनक्षमतेत कसलाही बदल होणार नाही. पालिका योग्य त्या मुद्द्यांसह आपले म्हणणे प्राधिकरणापुढे सादर करील.
- कुणाल कुमार,
आयुक्त, महापालिका

मेट्रोला आमचा कोणाचाही विरोध नाही; मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार नदीपात्रात बांधकाम करण्यास मनाई आहे. या आदेशारकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे सध्याच्या मार्गावरून दिसते. हा मार्ग बदलावा, असे आमचे म्हणणे आहे.’’
- अनू आगा, खासदार

Web Title: Environmental Metro Rail route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.