पोलीस आयुक्तालयात गटबाजीमुळे कुरघोड्या

By admin | Published: May 27, 2016 04:51 AM2016-05-27T04:51:45+5:302016-05-27T04:51:45+5:30

अधिकारी चांगले अथवा वाईट हे ठरवण्याचे नेमके मोजमाप काय, असा प्रश्न नुकत्याच झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच

Due to clash of police commissioner | पोलीस आयुक्तालयात गटबाजीमुळे कुरघोड्या

पोलीस आयुक्तालयात गटबाजीमुळे कुरघोड्या

Next

पुणे : अधिकारी चांगले अथवा वाईट हे ठरवण्याचे नेमके मोजमाप काय, असा प्रश्न नुकत्याच झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांनंतर उपस्थित केला जाऊ लागला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्ह्यांचा तपास आणि तक्रारींचे निराकरण करण्याची मोठी जबाबदारी असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या महत्त्वाच्या मानल्या जाणात्र्या बदल्यांमध्ये होणारा पक्षपातीपणा शहर पोलीस दलात अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे. जो आपल्या ‘गटा’तला तो अधिकारी चांगला, असा नियम काही अतिवरिष्ठ राबवीत आहेत. वरवर शांत वाटत असलेल्या पोलीस दलात अंतर्गत धुसफूस आणि अस्वस्थता आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सध्या दोन अदृश्य गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एक गट एका अतिवरिष्ठाच्या ‘सेवेत’ मग्न आहे, तर दुसरा गट अस्थिर आहे. नुकत्याच राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ७० निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये काही अधिकारी खरोखरीच बदली करण्यालायकच आहेत यात शंका नाही; परंतु ज्यांच्या कामाचा आलेख चांगला आहे अशा कर्तबगार अधिकाऱ्यांनाही शहराबाहेर हुसकावण्यात आले आहे. यामधून कर्तव्यदक्ष महिला अधिकारीही सुटू शकलेल्या नाहीत. या बदल्यांसाठी कोणती अपवादात्मक प्रकरणे निर्माण झाली होती आणि त्यांच्याकडून जनहिताला कोणती बाधा आली होती, याचा खुलासा काही अधिकारी मागण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन अतिवरिष्ठांच्या मनमानी कारभाराला ‘मॅट’मध्ये आव्हान देण्याची तयारीही सुरू केली आहे. तर, काही जणांंनी गुरुवारी मॅट न्यायालयामधून या बदली आदेशाला स्थगितीही मिळविली. बदल्यांमध्ये काही जणांना अभय देऊन पक्षपात करण्यात आला असून, आपल्या गोटातील अधिकाऱ्यांना ‘क्रीम’ पोस्टिंग देण्यासाठी काही जागा जाणीवपूर्वक रिकाम्या करण्यात आल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. कारवाईच्या नावाखाली ‘लूट’? दोन आठवड्यांपूर्वी आयुक्तालयात ‘जरब’ बसवू पाहणाऱ्या एका विशेष अधिकाऱ्याने खडक पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने कोंढव्यातील एका क्रिकेट बुकीला अक्षरश: लुटले आहे. ‘अतुल’नीय कामगिरी पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने या अधिकाऱ्याने स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे. या क्रिकेट बुकींच्या घरामध्ये घुसून मोबाईल ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याचे समजते. ही बाब दुसऱ्या दिवशी उघड होताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने एका मध्यस्थामार्फत बुकींसोबत समेटाचा प्रयत्नही केला. याप्रकरणात ना अद्याप गुन्हा दाखल झाला आहे, ना कोणता अहवाल सादर केला गेला आहे. अशा प्रकारे कारवाई करण्याच्या नावाखाली सध्या एका बाजूला ‘धाड’सत्र सुरू असतानाही त्याकडे वरिष्ठ दुर्लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यावर यापूर्वी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली होती. आपल्या पोलीस दलातील ‘सेवे’मध्ये वादग्रस्त ठरलेला हा अधिकारी सध्या काही गुन्हेगारांच्या संपर्कात आहे. काही अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचलाक कार्यालय तसेच शासनदरबारी आपली कैफियत मांडण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कनिष्ठ अधिकारी स्वत:च्या वेदना एकमेकांना शेअर करीत आहेत. त्यातून एक नवा असंतोष निर्माण होऊ लागला आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला पोलीस दलाला शिस्त लावण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे बेशिस्त अधिकारी ताळ्यावर येत आहेत. नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळत आहे. काही ठराविक अधिकाऱ्यांना झुकते माप दिले जात असून, त्यांच्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Due to clash of police commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.