Pune: दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी

By नितीन चौधरी | Published: November 22, 2023 01:27 PM2023-11-22T13:27:27+5:302023-11-22T13:30:28+5:30

या दिवाळीत अर्थात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या महिनाभरात ७ हजार ५५० घरांची खरेदी झाली आणि बांधकाम क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे...

Diwali fulfilled the dream of houses, as many as seven and a half thousand houses were purchased in a month | Pune: दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी

Pune: दिवाळीत पावली 'गृह'लक्ष्मी, महिनाभरात तब्बल साडेसात हजार घरांची खरेदी

पुणे : उत्साह आणि आनंदाची उधळण करीत यंदाच्या दिवाळीने सर्वच क्षेत्रांत चैतन्य आणले आहे. बांधकाम क्षेत्रही याला अपवाद नाही. या दिवाळीत अर्थात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या महिनाभरात ७ हजार ५५० घरांची खरेदी झाली आणि बांधकाम क्षेत्राला नवी झळाळी मिळाली आहे. गतवर्षीही या काळात ७ हजार ६०० घरांची घरेदी झाली होती. यावरून कोरोनामुळे आलेली काजळी दिवाळीत दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनामुळे २०२० ते २०२२ या दोन वर्षांच्या काळात बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी पसरली होती. ही काजळी दूर करण्याचे काम दिवाळी सणाने केले आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतच्या महिनाभराच्या काळात सलग दोन वर्षे घर खरेदीचा उच्चांक स्थापन झाला आहे.

शहरात घरखरेदी जोमात सुरू असून, पाडव्याच्या मुहूर्तावर घरांचे मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे. पुढील दोन महिन्यांच्या काळात यात आणखीन वाढ होईल, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ने व्यक्त केली आहे. या घरखरेदीत मोठ्या घरांचा वाटा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

स्पेसियस घरांना अधिक पसंती :
कोरोनामध्ये विलगीकरण माेठ्या प्रमाणावर करावे लागल्याने माेठ्या घराची गरज प्रकर्षाने भासली. शिवाय याच काळात घरातूनच काम अर्थात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आली. त्यामुळे पुढील काळात नागरिकांनी घर खरेदी करताना माेठ्या घरांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या घर खरेदीत मोठा वाटा हा स्पेसियस घरांचा आहे.

‘क्रेडाई’या आकडेवारीनुसार...

७ हजार ५५० घरांची खरेदी

यंदाच्या दिवाळीतील उलाढाल (१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर)

७ हजार ६०० घरांची खरेदी
गतवर्षी दिवाळीतील उलाढाल (२५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर)

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर अधिक बुकिंग :

‘क्रेडाई’चे जनसंपर्क अधिकारी कपिल गांधी म्हणाले, “घर खरेदी तसेच बुकिंगचे प्रमाण दसऱ्याच्या काळात खूप वाढते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणावर घरांचे बुकिंग झाले असून, यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.”

काेणत्या भागाला मिळतेय अधिक प्राधान्य?
- शहराचा विचार करता पश्चिम भाग, मध्यवर्ती भाग, तसेच उत्तर पुण्याच्या भागात हिंजवडी, औंध, बाणेर या परिसरात आयटी कंपन्यांचे प्राबल्य आहे. याला जोडूनच औद्योगिक भाग आहे. विशेष म्हणजे हा भाग ‘एक्स्प्रेस-वे’ने मुंबईशी जोडला आहे.

- मेट्रोची कनेक्टिव्हिटी देखील वाढली आहे. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शाळा, महाविद्यालयेदेखील तुलनेने या भागात जास्त आहेत. त्यामुळे शहराच्या इतर भागांच्या तुलनेत या भागात घरखरेदीला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

- पूर्व पुण्यातील हडपसर, खराडी, वाघोली, कल्याणीनगर, विमाननगर या भागांतही आयटी कंपन्या वाढत आहेत. त्यामुळे या परिसरातही घर खरेदीसाठी ग्राहक प्राधान्य देत आहेत, असे ‘क्रेडाई’, पुणेचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या तिजाेरीत ३४६ कोटी :

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माहितीनुसार, शहरात १ ते २० नोव्हेंबरदरम्यान १२ हजार ६९२ दस्तांची नोंदणी झाली. यातून ३४६ कोटी १८ लाख ४४ हजार ९८० रुपयांचा महसूल राज्य सरकारकडे जमा झाला आहे. १ ते ९ नोव्हेंबर या काळात दररोजची दस्त नोंदणी १ हजारांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ९ नोव्हेंबरला उच्चांकी १ हजार ८२० दस्तांची नोंदणी झाल्याची माहिती पुणे शहराचे सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली. दसऱ्यानंतर धनत्रयोदशीपर्यंत घराचे बुकिंग केलेले असल्यास त्याची दस्त नोंदणी करून घ्यावी, असा ग्राहकांचा कल असतो. त्यानंतर येणाऱ्या सुट्या लक्षात घेऊन दस्त नोंदणीची प्रक्रिया धनत्रयोदशीपूर्वीच केली जात असल्याने ही संख्या वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तारीख : दस्त नोंदणी
१ नोव्हेंबर : ११५९

२ नोव्हेंबर : ११६६
३ नोव्हेंबर : १३४५

४ नोव्हेंबर : २६९
५ नोव्हेंबर : ३३३

६ नोव्हेंबर : ११०१
७ नोव्हेंबर : १२८९

८ नोव्हेंबर : १०४९
९ नोव्हेंबर : १८२०

११ नोव्हेंबर : २८४
१३ नोव्हेंबर : ४३९

१६ नोव्हेंबर : ५८५
१७ नोव्हेंबर : ८१५

१८ नोव्हेंबर : १७२
१९ नोव्हेंबर : १०९

२० नोव्हेंबर : ७५७
एकूण १२,६९२

एकूण महसूल

३४६ कोटी १८ लाख ४४ हजार ९८०

यंदाची दिवाळी बांधकाम क्षेत्राला तुलनेने चांगली गेली आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये आणखी प्रतिसाद वाढून घरखरेदी वाढण्याची अपेक्षा आहे. यंदा सुमारे साडेसात हजार घरांची विक्री झाली आहे. कोरोनानंतर सलग दोन वर्षे बांधकाम क्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दिवाळीचा काळ चांगला गेला, असे म्हणता येईल.

- रणजित नाईकनवरे, अध्यक्ष, ‘क्रेडाई’, पुणे

Web Title: Diwali fulfilled the dream of houses, as many as seven and a half thousand houses were purchased in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.