ठळक मुद्देअपघात १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला खराडी बी. आर. टी. मार्गावरदोघांना जखमी अवस्थेत टाकून आरोपी वाहनासह झाला होता पसार

पुणे : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील खराडी बी. आर. टी. मार्गावर घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
चंद्रकांत खुशाल कपाले (रा. जाधववाडी, चिखली, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चालक गौरव दीपचंद जैन (रा. लॅण्डमार्क गार्डन, कल्याणीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत वारे (वय २२, रा. जाधववाडी, चिखली, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारे आणि कपाले एकाच दुचाकीवरुन बीआरटी मार्गामधून जात होते. त्यावेळी आरोपी जैन चालवीत असलेल्या भरधाव मोटारीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने कपाले यांचा जागीच मृत्यू झाला. 
तर वारे गंभीर जखमी झाले. या दोघांना जखमी अवस्थेत टाकून आरोपी वाहनासह पसार झाला होता. वारे यांना उपचारांसाठी नांदेड जिल्ह्यात मूळ गावी नेण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार घेऊन परत आल्यानंतर त्यांनी याबाबत फिर्याद दिली. पुढील तपास उपनिरीक्षक ए. एम. आठरे करीत आहेत.