स्वच्छतेला तिलांजली, शिक्षकांचे होतेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:04 AM2017-09-20T01:04:11+5:302017-09-20T01:04:40+5:30

स्वच्छतेच्या बाबतीत मागासलेल्या पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किंचितही काळजी नसल्याचे वारंवार जाणवत होते. विद्यार्थी जेवायला बसल्यानंतर शिक्षक कर्मचा-यांचे पादत्राणे घालून पंगतीमधून फिरणे, विद्यार्थ्यांना जेवायला खाली जमिनीवर बसविणे, धुळीने माखलेल्या परिसरातच पोषक आहार देण्याची योजना पालिकेच्या शाळेत राबवली जात असल्याची खंत पालकांनी या वेळी बोलून दाखविली.

Cleanliness is to be abandoned, teachers are neglected by the health of students | स्वच्छतेला तिलांजली, शिक्षकांचे होतेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

स्वच्छतेला तिलांजली, शिक्षकांचे होतेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

googlenewsNext

पिंपरी : स्वच्छतेच्या बाबतीत मागासलेल्या पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत किंचितही काळजी नसल्याचे वारंवार जाणवत होते. विद्यार्थी जेवायला बसल्यानंतर शिक्षक कर्मचा-यांचे पादत्राणे घालून पंगतीमधून फिरणे, विद्यार्थ्यांना जेवायला खाली जमिनीवर बसविणे, धुळीने माखलेल्या परिसरातच पोषक आहार देण्याची योजना पालिकेच्या शाळेत राबवली जात असल्याची खंत पालकांनी या वेळी बोलून दाखविली. तसेच विद्यार्थी हात न धुताच पोषण आहार खात असल्याने ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.
>शासनाचे निकष बसविले धाब्यावर
दिघी येथील महापालिकेच्या शाळेत सकाळी नऊ वाजता शालेय पोषण आहार घेऊन येणारी रिक्षा दाखल झाली. रिक्षातील पोषण आहार बाहेर काढून शाळेच्या बाहेर आवारातच ठेवण्यात आला. शालेय पोषण आहारवाटप करण्यासाठी दोन महिला हजर होत्या. आहाराची चव पडताळून लगेच विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप सुरू करण्यात आले. चव पडताळून पाहिल्यानंतर अर्ध्या तासाने आहारवाटप करण्यात यावा, या निकषाला मात्र गंभीरतेने घेतले गेले नाही.
दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे एकामागून एक विद्यार्थी शाळेच्या वर्गखोलीतून बाहेर पडत सरळ आहार घेण्यासाठी रांगेत उभी राहत होती. मात्र, विद्यार्थ्यांना हात धुण्यासंदर्भात शिक्षकांकडून विचारणा झाली नाही व काळजी घेतली गेली नाही. तसेच आहारवाटप करणाºया स्वयंपाकी व मदतनीस महिलांनी आहारवाटप करण्याअगोदर हात पाय स्वच्छ साबणाने धुऊन, आहारवाटप करायचा असतो. हात पुसायला स्वच्छ कापड, डोक्यावरील केस मोकळे न ठेवता व्यवस्थित बांधून संरक्षित केलेले असावेत, उघड्या हाताने आहारवाटप करू नये, उघड्या ठिकाणी अन्नावर धूळ बसू नये, म्हणून संरक्षक जाळी वा स्वच्छ झाकण ठेवावे या साध्या स्वच्छतेच्या नियमाला पायदळी तुडवण्यात आले. आहार घेण्यासाठी असलेली ताटे फक्त काही विद्यार्थ्यांच्या हातात दिसत होती. बाकी विद्यार्थी घरून आणलेल्या प्लॅस्टिकच्या छोट्या डब्यात आहार घेत होती. ज्या विद्यार्थ्यांनी ताटांमध्ये आहार घेऊन खाल्ला ते विद्यार्थी ताट स्वत:च धुऊन घेत आतमध्ये नेऊन ठेवत होते.
प्रशासनाने स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामाची जबाबदारी ठरवून दिलेली असताना विद्यार्थ्यांना ताट धुवायला लावणे खरचं लाजारवाणी बाब आहे. आहार वाटपासोबत पिण्याचे पाणीसुद्धा विद्यार्थ्यांना देण्याचे काम या महिलांचे असताना याकडे मुख्याध्यापक व व्यवस्थापन समिती डोळेझाक का करत आहे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
>यंत्रणेला लागलेली कीड कोण काढणार?
पिंपळे गुरव येथे बालकांच्या सदृढतेसाठी शासनाच्या वतीने मुलांना शालेय पोषण अंतर्गत शाळेच्या मध्यंतरी खिचडीचे वाटप केले जाते. ही खिचडी म्हणजे तापवलेल्या दुधावरची साय काढून दूध वाटप करण्यासारखा प्रकार आहे.
सांगवी, पिंपळे गुरव व दापोडी परिसरामध्ये प्राथमिक शाळांमध्ये बालकांना शाळेविषयी गोडी व सदृढ आरोग्य लाभावे म्हणून लहान गटांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थांना खिचडीचे वाटप केले जाते. ही शासकीय योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय स्तरावर अतोनात प्रयत्न जरी होत असले, तरी खिचडी निर्माण करणारी यंत्रणेला किड लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने मुलांना शाळेमध्ये खिचडी खाता यावी म्हणून संख्येप्रमाणे थाळी पुरविण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश शाळेमध्ये या थाळ्या बंद कपाटामध्ये आहेत.
या थाळ्या बाहेर काढणे, वाटप करणे, पुन्हा धुऊन ठेवणे आदी कामे कोण करणार आदी प्रश्नांना पोषण आहार विभागाने पूर्णविराम देऊन टाकला आहे.
या खिचडीची दररोजची चव कशी आहे, याची चव नोंदवही आहे. मात्र ही नोंद आठवड्याला किंवा महिन्याकाठी एकाच वेळी केली जाते. बहुतांश शाळांमधून कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार दिसून येतो. विद्यार्थ्यांना माणसी प्रमाणानुसार आहार दिला जात नाही. बहुतांश मुले या योजनेचा लाभ घेत नसल्याचे दिसून येते.
>विकासनगरला पुरेसा पोषण आहार
महापालिकेच्या विकासनगर व किवळे येथील शाळांत पुरेसा पोषण आहार मिळत असल्याचे चित्र दिसून आले. मात्र किवळे येथील मनपा शाळेत स्टील ताटांऐवजी प्लॅस्टिकच्या डब्यात शालेय पोषण आहारवाटप करण्यात येत असल्याचे दिसून आले. विकासनगर येथील मराठी शाळेत सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी शाळेची घंटा वाजताच शाळा इमारतीच्या पहिल्या व दुसºया मजल्यावरून तळ मजल्यावर येताना दिसले. तळमजल्यावर आल्यानंतर त्यांनी एका टेबलवर अगोदरच ठेवण्यात आलेली स्टील ताटे घेतली. ताटे हातात पडताच शाळेच्या आवारातील नळावर जाऊन पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर पंगत बसली. सेविका महिलेने सर्वांना जागेवर जात खिचडी भात वाढला. भात खाऊन झाल्यानंतर काहींनी पुन्हा मागितला असता पुन्हा भात दिला गेला.
या वेळी काही शिक्षक शालेय पोषण आहार वाटपावर लक्ष ठेवत असल्याचे दिसून आले. प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेसा व योग्य आहार देण्यात आला. किवळे गावठाण येथील मनपाच्या मराठी शाळेत दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी शाळा इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच एक सेविका सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण वाटप करीत असल्याचे दिसून आले. या शाळेत एकही विद्यार्थ्यांच्या हातात स्टील ताट दिसले नाही़ सर्व विद्यार्थी प्लॅस्टिक डब्यांत खिचडी भात घेताना दिसून आली. या वेळी खिचडीवाटप करताना काही शिक्षक उपस्थित होते. स्टीलच्या ताटांबाबत काही विद्यार्थ्यांकडून व एका शिक्षकाकडून माहिती घेतली असता स्टील ताटे शाळेत आहेत़ मात्र नेहमी वापरत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
>उघड्यावरच पोषण आहार
चिखली येथील महापालिका शाळा मुले क्रमांक ९० व मुली क्र. ९१ येथे सुमारे दुपारी १.३० च्या सुमारास स्टीलच्या डब्ब्यांमध्ये शालेय पोषण आहार आला. ज्या डब्ब्यात भात आला ते डब्बे व्यवस्थित सीलबंद केलेले होते़ शाळेची डब्ब्याची सुटी दुपारी २.३० वा. होत असते. सुमारे एक तास आधी आलेला भात शाळेच्या स्टेजवर उघड्यावर ठेवण्यात आला. मुलांची सुटी झाल्यानंतर रांगेत एकापाठोपाठ एकेक मुलाला त्याने घरून आणलेल्या डब्ब्यात अथवा थाळीमध्ये दोन कर्मचारी महिला भात देत होत्या. मुलांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या़ कित्येक मुले आपला नंबर कधी येणार याची प्रतीक्षा करत ताटकळत उभी होती. काही जवळच आपापले डबे खात बसली होती.
>आहार घेण्यासाठी नाही जागा
सांगवी येथे रोज सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा आहार शाळेपर्यंत पोहचवण्याचे काम केले जाते. मात्र, शाळा परिसरातील मुलांना शाळा परिसरात बसण्यासाठी जागा नसून, मुले खालीच बसतात. उघड्यावर पोषण आहार दिल्याने माशा आणि अस्वछता याचा त्रास दिसून येतो. विद्यार्थ्यांना उघड्यावर बसवून पोषण आहार दिल्याने आजारास निमंत्रण मिळत आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी ओल्या जागेत बसून पोषण आहार घेताना दिसून येतात. तर पोषण आहार देणारे कर्मचारी यांना पोषण आहार देताना हातमोजे अथवा इतर स्वच्छता राहील, अशा साधनांची गरज असल्याचे दिसून येते. आहार देताना योग्य काळजी घ्यावी, अशी पालकांची मागणी आहे.
>संकलन : देवराम भेगडे, बलभीम भोसले, शशिकांत जाधव,योगेश गाडगे, संदीप सोनार

Web Title: Cleanliness is to be abandoned, teachers are neglected by the health of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.