भाजप नेते संजय काकडे, निलेश राणे यांनी थकविली पुणे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:54 PM2021-06-15T22:54:44+5:302021-06-15T22:55:50+5:30

पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप कारवाई करणार का? राष्ट्रवादीचा सवाल

BJP leaders Sanjay Kakade and Nilesh Rane are defaulter of Pune Municipal Corporation | भाजप नेते संजय काकडे, निलेश राणे यांनी थकविली पुणे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

भाजप नेते संजय काकडे, निलेश राणे यांनी थकविली पुणे महापालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी

Next

संजय काकडे, निलेश राणे यांच्यावर पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप कारवाई करणार का? राष्ट्रवादीचा सवाल
पुणे :‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देत पुणे महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने आपल्या नेत्यांना पाठीशी घालण्यात आणि सामान्य पुणेकरांकडील थकबाकी वसूल करण्यातच पुढे असल्याचा ‘डिफरन्स’पणा दाखवून दिला आहे. त्यामुळेच काकडे यांनी सुमारे ६६ लाख रुपयांची आणि राणे यांनी १७ लाख रुपयांच्या थकबाकीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे असा आरोप करतानाच पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या संजय काकडे यांना थकलेली पाणीपट्टी भरण्याचीही तसदी घ्यावी वाटत नाही, हे जितके निषेधार्ह आहे, तितकेच लाजीरवाणेही आहे अशी टीका देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. 

पुणे महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या ८५६ थकबाकीदारांची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनेक आस्थापने, व्यक्ती व व्यावसायिकांचा समावेश असला, तरी पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे संजय काकडे व नीलेश राणे या माजी खासदारांचा समावेश आहे. 

याबाबत जगताप म्हणाले, पुणे पालिकेत आपलीच सत्ता आहे आणि आपण पक्षाचे नेते आहोत, त्यामुळे आपल्याला कोण विचारणार आहे, या भ्रमात ते असतील. परंतु, महानगरपालिकेत जमा होणारा पैसा हा जनतेचा असून, जनतेच्या विकासासाठी तो खर्च करावा लागतो. जे नियम सामान्य पुणेकरांना आहेत, तेच तुम्हालाही लागू आहेत. त्यामुळे, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असलेल्या भाजपकडून संजय काकडे आणि नीलेश राणे यांच्याकडील थकबाकी वसूल करण्याची, प्रसंगी कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवेल का, हा सामान्य पुणेकरांचा प्रश्न आहे. संजय काकडे हे पुणे महानगरपालिकेबाबत नेहमीच मोठमोठ्या वल्गना करण्यात मश्गुल असतात. त्यांनी पालिकेच्या गोष्टी नंतर कराव्यात, आधी एक नागरिक म्हणून थकबाकी भरावी अशी आमची मागणी आहे. 

पुणे महापालिकेने घोषित केलेल्या २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या ८५६ थकबाकीदारांची यादीत अनेक मोठे मासे आहेत. परंतु, ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे, त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडणे लाजिरवाणे आहे. कदाचित त्यांना या गोष्टींनी फरक पडत नसला, तरी महानगरपालिकेला आणि सामान्य जनतेला फरक पडतो. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महापालिकेकडून संजय काकडे व निलेश राणे यांच्यावर कारवाई होईल का? भाजप आणि या पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही ही बाब खपवून घेणार का? असा सवालही प्रशांत जगताप यांनी  उपस्थित केला.

Web Title: BJP leaders Sanjay Kakade and Nilesh Rane are defaulter of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.