अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:36 PM2024-05-03T18:36:14+5:302024-05-03T18:40:12+5:30

Amruta Khanvilkar : अमृता सोशल मीडियावर हिंमाशूसोबतचे फोटो शेअर करत नाही त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान आता तिने हिमांशुसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचे कारण सांगितले आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra) सोबत लग्न केले आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अमृता आणि हिमांशूला एकत्र काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

अमृता सोशल मीडियावर हिंमाशूसोबतचे फोटो शेअर करत नाही त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान आता तिने हिमांशुसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचे कारण सांगितले आहे.

अमृता खानविलकर हिने नुकतेच झूम चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली की,आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत, असे मला वाटते. काही लोकांना तुम्ही आवडता तर काहींना नाही. जोपर्यंत ते तुमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत नाही तोपर्यंत सगळे काही ठीक आहे.

ते माझ्या कामाबद्दल आणि मी इन्स्टाग्रामवर जे शेअर करते त्याविषयी बोलतात, तो पर्यंत सगळे ठीक आहे. मात्र ते जेव्हा मला, माझ्या कुटुंबाला किंवा मला आणि हिमांशुला ट्रोल करणे सुरु करतात, तेव्हा मला ते आवडत नाही.

मी त्याच्याबद्दल काही पोस्ट करत नाही, कारण मला त्याला या सगळ्यापासून दूर ठेवायचे आहे. माझ्यासाठी त्याच्याविषयी सगळे काही शेअर करण्यापेक्षा त्याचा बचाव करणे खूप महत्त्वाचे आहे, त्याचे कारण म्हणजे तो या इंडस्ट्रीतून नाही.

कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्याला दु:ख होऊ शकते. याची मी नेहमीच काळजी घेतली आहे, घेते आणि घेत राहीन, असे अमृता म्हणाली.

हिमांशू आणि माझे जास्त फोटो सोशल मीडियावर शेअर न केल्यामुळे मला ट्रोल करण्यात आले. पण मी माझ्या आई-वडिलांकडे पाहते, जे गेल्या ४५ वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही आणि मला तेच करायचे आहे.

मी जुन्या विचारसरणीची आहे. मी आणि हिमांशु एकमेकांना तेव्हापासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम अस्तित्वात नव्हते. २००४ पासून एकमेकांना आम्ही ओळखतो आहे, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची असल्याचे अमृता खानविलकरने म्हटले.