सावकारांच्या धमकीमुळे ५१ वर्षीय इसमाने केली आत्महत्या, मुंढवा परिसरातील घटना

By नितीश गोवंडे | Published: November 25, 2023 06:10 PM2023-11-25T18:10:04+5:302023-11-25T18:11:36+5:30

सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या...

51-year-old Isma committed suicide due to moneylenders' threat, incident in Mundhwa area | सावकारांच्या धमकीमुळे ५१ वर्षीय इसमाने केली आत्महत्या, मुंढवा परिसरातील घटना

सावकारांच्या धमकीमुळे ५१ वर्षीय इसमाने केली आत्महत्या, मुंढवा परिसरातील घटना

पुणे : सावकारांच्या सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राम परशुराम भोसले (५१, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, पाटील याची पत्नी, तसेच अजित इरकल यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांची आई आजारी होती. आईचे आजारपण आणि वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी सात वर्षांपूर्वी आरोपी राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाची परतफेड केल्यानंतरही आरोपींनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे भोसले यांनी आरोपी अडसूळ याच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले. शंकर पाटील, त्याची पत्नी आणि इरकल यांनी त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्यास मदत केली होती. त्याबदल्यात यांना भोसले यांनी ५० हजार रुपये देखील दिले होते.

दरम्यान, व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करत असताना देखील आरोपी त्रास देऊन धमकी देत असल्याने भोसले यांनी घरातच गळफास घेत आत्महत्या केली. बेकायदा सावकारी करणार्‍या आरोपींच्या धमक्यांमुळे पतीने आत्महत्या केल्याचे भोसले यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे करत आहेत.

Web Title: 51-year-old Isma committed suicide due to moneylenders' threat, incident in Mundhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.