जेजुरीतील एकाच कुटुंबातील ३ ठार, तिघे गंभीर, आई, मुलगा व नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:18 AM2018-06-19T01:18:58+5:302018-06-19T01:18:58+5:30

भरधाव डंपरने मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले

3 dead in Jejuri's family, three dead, three serious, mother, son and granddaughter die | जेजुरीतील एकाच कुटुंबातील ३ ठार, तिघे गंभीर, आई, मुलगा व नातवाचा मृत्यू

जेजुरीतील एकाच कुटुंबातील ३ ठार, तिघे गंभीर, आई, मुलगा व नातवाचा मृत्यू

Next

जेजुरी/ विटा : भरधाव डंपरने मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार झाले, तर एका लहान मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात सांगली जिल्ह्यातील माहुली (ता. खानापूर) येथे बसस्थानकासमोर सोमवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास झाला.
सुरेश किसनराव देवकाते (वय ४५), त्यांची आई सुनंदा किसन देवकाते (६७) व मुलगा यश ऊर्फ बबलू सुरेश देवकाते (५, सर्व रा. जेजुरी, जि. पुणे, मूळ गाव जत, जि. सांगली) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. या अपघातात सुरेश यांची पत्नी शोभा सुरेश देवकाते (४५), मुलगी सई सुरेश देवकाते (४) व बहीण स्नेहलता किसन देवक ाते (४०) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
देवकाते कुटुंब हे मूळचे जत येथील, पण नोकरीनिमित्त ते जेजुरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले आहेत. सुरेश देवकाते हे अभियंता होते, ते तळेगाव-दाभाडे (जि. पुणे) येथे नोकरीस होते.
नातेवाईकाच्या लग्नासाठी देवकाते कुटुंबीय जेजुरीहून मायणी, विटामार्गे जयसिंगपूरला मोटारीने (एमएच २० एच ११३२) निघाले होते. सुरेश मोटार चालवित होते. गाडीत त्यांच्यासह सहा जण होते. सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता त्यांची मोटार माहुली बसस्थानकासमोर आली असताना, विट्याहून मायणीकडे भरधाव निघालेल्या वाळूच्या डंपरने (एमएच १० एडब्ल्यू ८१९५) त्यांच्या मोटारीला समोरून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की मोटारीच्या पुढील आसनावर बसलेले चालक सुरेश, आई सुनंदा व मुलगा बबलू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना हालचाल करण्याची संधीही मिळाली नाही. तसेच पाठीमागील आसनावर बसलेली त्यांची पत्नी शोभा, मुलगी सई व बहीण स्नेहलता हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
>मोटारीचा चक्काचूर...
या अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. धडक देणारा डंपर वाळू देऊन रिकामा परत चालला होता. अपघात होताच डंपरचालकाने पलायन केले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर
व मोटार ताब्यात घेतली आहे.
>हृदयद्रावक दृश्य...
मोटारीच्या पुढील आसनावर सुरेश, त्यांची आई सुनंदा व आजीच्या मांडीवर पाच वर्षांचा बबलू, असे तिघे होते. डंपरने धडक दिल्यानंतर मोटारीत डाव्या बाजूला बसलेला मुलगा व आई यांच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघाताचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांची मने हेलावली.
>स्थानिकांची मोठी मदत... : माहुली येथे बसस्थानकासमोरच मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाल्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी जखमींना बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
>माहुली (ता. खानापूर) येथे सोमवारी वाळूच्या डंपरने मारुती मोटारीला समोरून धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात मोटारीची दुरवस्था झाली.

Web Title: 3 dead in Jejuri's family, three dead, three serious, mother, son and granddaughter die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.