अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:40 AM2018-12-12T02:40:12+5:302018-12-12T02:40:35+5:30

वाहतूक नियमांची पायमल्ली; छेडछाडीच्या घटनांत वाढ

Minor bikers have traffic police ignored | अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

अल्पवयीन दुचाकीस्वारांकडे वाहतूक पोलिसांचे होतेय दुर्लक्ष

googlenewsNext

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालक मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असताना पोलीस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.

शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी मुले पालकांच्या मर्जीने वा मर्जीशिवाय दुचाकी वाहनांचा सर्रास वापर करतात. शहरातून ट्रिपल सीट अथवा चौबल सीट बसून वेड्यावाकड्या पद्धतीने जोरात वाहन चालवून कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचेदेखील त्यांच्याकडून उल्लंघन केले जाते. मुलींना कट मारणे व छेडछाड आदी प्रकार घडत आहेत. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या या अल्पवयीन वाहन चालकांकडे स्थानिक पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. पोलीस ठाण्याचा कारभार सकाळी दहानंतर सुरु होत असल्याने, तसेच शहरातील वाहतूककोंडी व वाहतुकीच्या इतर समस्या सोडवण्यापेक्षा महामार्गावर चिरीमिरी गोळा करण्यात वाहतूक पोलीस व्यस्त असल्याने कामशेत शहरातील मुख्य रस्त्यांवर या अल्पवयीन मुलांचे फावले आहे.

विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कशपणे हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहनांना व पादचाºयांना कट मारणे, विशेषत: मुलींना कट मारणे याचप्रमाणे वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन लावणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात. याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळ अपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणावह वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. त्याचमुळे अनेक पालक शाळा-कॉलेज-शिकवणी वा इतरत्र जाण्यासाठी मुलांना दुचाकी
वाहन बिनदिक्कत देत असल्याने मुलांकडून त्याचा गैरवापर होत आहे. वाहतूक पोलिसांच्या उदासीनतेमुळे अनेक मुलांना पोलिसांची भीतीही उरलेली नाही. त्यामुळे रस्त्याने येजा करणाºया पादचाºयांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे़ कारण आपण व्यवस्थित चाललो असलो तरी कधी कोण कुठून आणि कसा येईल याची शाश्वती राहिली नाही़ त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना रस्त्याने येजा करणे कठीण होत आहे. 

हुल्लडबाज तरुणांचा धिंगाणा
कामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, सर्वत्र खडीचे साम्राज्य आहे. या खड्ड्यांमधून व खडीतून जोरात गाडी चालवून अपघात होत आहेत. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तर रात्रीच्या वेळी गाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे लावून इतर वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. वाहतूक पोलीस याकडे काणाडोळा का करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहरात व महामार्गावर अल्पवयीन दुचाकीचालकाला पकडून मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केल्यास अल्पवयीन दुचाकी, चारचाकी चालवणाºया मुलांवर व त्यांच्या पालकांवर जरब बसेल व अनेक छोटे-मोठे अपघात होणार नाहीत. तसेच मुलींना त्रास होणार नाही, असे लोकांकडून बोलले जात आहे.

Web Title: Minor bikers have traffic police ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.