विसापूर किल्ल्यावर अाढळले ताेफगाेळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 04:54 PM2018-11-07T16:54:37+5:302018-11-07T16:55:54+5:30

विसापूर विकास मंचाच्या कार्यकर्त्यांना विसापूर किल्ल्यावर पुरातन ताेफगाेळे अाढळले अाहेत.

histrocal bomb found on visapur fort | विसापूर किल्ल्यावर अाढळले ताेफगाेळे

विसापूर किल्ल्यावर अाढळले ताेफगाेळे

Next

लोणावळा : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने गेली अठरा वर्षे मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य केले जाते. दरवर्षी प्रमाणे दिवाळीमध्ये मंचाच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

दीपोत्सवानंतर मंचाचे कार्यकर्ते गडभटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारुगोळा कोठाराजवळ भूपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. पाहणी केली असता ८ ते १० किलो वजनाचे आणखी दोन लोखंडी तोफगोळे सापडले. सदर तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारात मोडतात. या तोफगोळ्यांमध्ये दारू भरून नंतर वातीद्वारे उडविले जात असत अशी माहिती डेक्कन कॉलेजचे तज्ञ इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी सांगितली. सदर तोफगोळे पुरातत्व विभागाच्या कर्मचारी हेमंत वाघमारे व सुभाष दहिभाते यांच्याकडे सुपूर्द केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साक्षात दुर्गलक्ष्मी अवतरल्याचा साक्षात्कार झाला. याप्रसंगी संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, वैभव गरवड, अमोल गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

मंचाच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व विभागाने नुकतेच शिवमंदिरचा जीर्णोद्धार केला आहे. पावसाळ्यात दक्षिणेकडील तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तूंची देखील दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या तटबंदीची व वास्तूंची दुरुस्ती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी मंचातर्फे करण्यात आली आहे. यानिमित्ताने अमूल्य ऐतिहासिक ठेवा जपला जाईल व लुप्त होत चाललेला शिवकालीन इतिहास दुर्गप्रेमींना उपलब्ध होईल.

मंचातर्फे दरवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला २२ नोव्हेंबर रोजी सायं ७ वा. लोहगड किल्ल्यावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.

Web Title: histrocal bomb found on visapur fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.