पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:43 AM2018-10-31T02:43:49+5:302018-10-31T02:44:26+5:30

अ‍ॅक्सेसरीजमध्ये ग्राहकांची फसवणूक; जीएसटी बिलाशिवाय राजरोस होतेय विक्री

Golmaal in Pimpri's mobile market | पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

पिंपरीच्या मोबाइल मार्केटमध्ये गोलमाल

Next

- प्रकाश गायकर 

पिंपरी : मोबाइल ही जीवनावश्यक बाब बनली आहे. मोबाइल घ्यायचा असो किंवा चार्जर; आठवण होते ती पिंपरीतील मोबाइल मार्केटची. कोणत्याही कंपनीचा मोबाइल व अ‍ॅक्सेसरीज मिळण्याचे शहरातले एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे पिंपरी मार्केट. परंतु या मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने उजेडात आणला आहे.

मोबाइल किंवा मोबाइलशी निगडित इतर साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी असते. महागडे मोबाइल, तसेच मोबाइलची बॅटरी, हेडफोन, चार्जर, ब्ल्यू टूथ हेडफोन येथे मिळतात. मात्र सामान्य ग्राहकांची दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. मोबाइलचे साहित्य विकून किमतीमध्ये व वॉरंटीमध्ये फिरवाफिरवी केली जाते. ठरावीक कंपनीच्या मोबाइलची बॅटरी विकताना ग्राहकाला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाते. वॉरंटीची वस्तू खरेदी केल्यानंतर जीएसटी बिल देणे अपेक्षित आहे. मात्र ग्राहकांना साधे लेखी बिल दिले जाते. त्यावर जीएसटी नंबर नमूद नसतो. सहा महिन्यांच्या आत बॅटरी खराब झाल्यानंतर ग्राहक बॅटरी बदलून घेण्यासाठी दुकानात जातो. त्या वेळी त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवण्यात येते. मात्र तेथे गेल्यानंतर ग्राहकांना नियमांचा पाढा वाचून दाखवला जातो. त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाल्याचे समजते.

सर्व्हिस सेंटरमधून बॅटरी बदलून घेण्यासाठी जीएसटी बिलाची आवश्यकता असते. तसेच बॅटरीची वॉरंटीही तीनच महिन्यांची असते. त्यामुळे बॅटरी बदलून देऊ शकत नाही, असे सांगण्यात येते. तसेच एकाच कंपनीच्या बॅटऱ्या चार प्रकारांत उपलब्ध असतात. साधी बॅटरीही ओरिजिनल बॅटरीप्रमाणेच बॉक्समध्ये ठेवलेली असते. ती साधी बॅटरी ओरिजनल असल्याचे भासवून विक्री करण्यात येते. वास्तविक साध्या बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती मोठ्या अक्षरात असते, तर ओरिजिनल बॅटरीच्या बॉक्सवरील माहिती ही अतिशय लहान अक्षरांमध्ये नमूद केलेली असते. मात्र याबाबत ग्राहकांना काहीच माहिती नसल्याने डुप्लीकेट बॅटºया वॉरंटी काळ देऊन अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जातात. ग्राहक पाहून २५० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत बॅटरीची किंमत सांगितली जाते. हे झाले बॅटरीचे उदाहरण मात्र इतर साहित्याबाबतही अशीच बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे.

मोबाइल हा सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतापर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एखाद्या व्यावसायिकांपासून ते गृहीणीपर्यंत सर्वांनाच मोबाइलची आवश्यकता आहे. त्यामुळे मोबाइलच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची येथे गर्दी असते. याच संधीचा विक्रेते फायदा घेतात. चार रुपयांची वस्तू ४० रुपयांना विकून विके्रते गलेलठ्ठ नफा कमावतात. त्याचवेळी ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.

ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्न
मोबाइल दुरुस्तीत येथे असणारे कारागिर एखाद्या डॉक्टरपेक्षा कमी नाहीत. डॉक्टरकडे गेल्यावर ज्याप्रमाणे डॉक्टर आजारांची माहिती
देऊन पैैसे उकळतात. तशाच प्रकारे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी गेल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी सांगून ग्राहकांना घाबरवण्याचा प्रयत्न
केला जातो. आपला मोबाइल खराब होऊ नये यासाठी ग्राहकही ते सांगतील त्यावर विश्वास ठेवून पैैसे खर्च करतात. त्याचाच फायदा घेत मोबाइलचा एक पार्ट खराब झाला असेल तर दहा पार्ट खराब झाल्याचे सांगून पैैसे उकळतात.

मोबाइलचे कोणतेही साहित्य घेतले, तरी त्यावर पक्के बिल दिले जात नाही. त्याचप्रमाणे वस्तूचे भावही काहीही सांगितले जातात. मोबाइलचे मोठे मार्केट म्हणून याची ओळख आहे. कोणतीही वस्तू चांगल्या भावामध्ये मिळण्याचे ठिकाण म्हणून ग्राहकांची पसंती असते. मात्र, याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करतात. त्यामुळे मार्केटची नावाजलेली ओळख पुसण्याची शक्यता आहे. - माधव दळवी, ग्राहक

अ‍ॅक्सेसरीजची नोंद सॉफ्टवेअरमध्ये केली जात नाही. त्यामुळे बिल बनवता येत नाही. परिणामी ग्राहकांना आम्ही जीएसटीचे बिल देऊ शकत नाही. - सचिन चिन्नापुरे, विक्रेते

Web Title: Golmaal in Pimpri's mobile market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.